पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वगळता एकाही नेत्याला नरेंद्र मोदींइतके फॉलोअर्स नाहीत. त्यामुळेच मोदी जेव्हा एखादी गोष्ट किंवा फोटो पोस्ट करतात तेव्हा त्याची चर्चा देशातच नाही तर जगभरामध्ये होते. सध्या असेच चित्र पहायला मिळत आहे मोदींनी अमेरिकेसाठी उड्डाण केल्यानंतर एअर इंडिया वनमधून पोस्ट केलेल्या एका फोटोची. या फोटोची सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा असून अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्यात. या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे.

नक्की पाहा हे फोटो >> अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत; पाहा खास फोटो

झालं असं की बुधवारी दुपारच्या सुमारास पंतप्रधान मोदी अमेरिकेसाठी दिल्लीमधून रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी मोदी अमेरिकेला रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत करोना महासाथ, दहशतवाद, हवामान बदल व इतर महत्त्वाचे मुद्दे आपण मांडणार आहोत, असं मोदी म्हणाले. मोदींनी विमानात बसल्यानंतर काम करतानाचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास मोदींनी शेअर केलेल्या या फोटोला सध्या १२ तासांच्या आतमध्ये १८ हजारांहून अधिक रिट्विट मिळाले आहेत. “फार दिर्घकाळ विमानप्रवास म्हणजे कागदोपत्री काम आणि काही महत्वाच्या फाइल्स तपासण्याची संधी असते,” अशा कॅप्शनसहीत मोदींनी हा फोटो शेअर केलेला.

नक्की वाचा >> मोदींच्या फोटोमधील ‘ती’ गोष्ट पाहून भारतीय म्हणाले, “पंतप्रधानही एवढे मध्यमवर्गीय आहेत की त्यांना…”

मोदींच्या या फोटोवर सात हजार ८०० हून अधिक कमेंट आल्या असल्या तरी या फोटोच्या खाली काही खास व्यक्तींनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. पंकजा यांनीही मोदींच्या या फोटोवर कमेंट केलीय. “भारताच्या सीमांच्या पलीकडेही अनेक भारत आहेत जे तुमची वाट पाहत आहेत. जगभरातून आपल्या देशाकडे सन्मानाने पाहिलं जातं. प्रत्येक क्षणी देशाचा सन्मान वाढवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होवोत यासाठी शुभेच्छा,” असं पंकजा यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वेळेनुसार आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अमेरिकेमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांनी एअर इंडिया वन या विशेष विमानाने भारतातून अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केलं होतं. मोदी अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टनमधील जॉइण्ट बेस अँण्ड्रूस विमानतळावर उतरले. या ठिकाणी भारतीयांनी मोदींचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलंय.