जंतर-मंतर या ठिकाणी CJP च्या नेतृत्वात एक आंदोलन पार पडलं. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाला विरोध करत हे आंदोलन ३७ दिवस सुरु होतं. या आंदोलनाला २० जुलै रोजी हिंसक वळण लागल्यावर देशभरात त्याचे पडसाद उमटले गेले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत रस्त्यावर उतरलेली जेन झी तरुणाईने अत्यंत अश्लाघ्य आणि शिवराळ भाषा वापरली. २५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. तरीही शिव्यांचा मुद्दा चर्चेत होता आणि पुढेही राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्टला व्हिडीओ पोस्ट करत सगळ्या जेन झी तरुणांना माफ करतोय असं जाहीर केलं. यानंतर मोदींचं देशभरातून कौतुक होतं आहे. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही एक व्हिडीओ पोस्ट करत नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

काय म्हटलंय पंकजा मुंडे यांनी?

“आज मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगते. आमच्या कोअर कमिटीची दिल्लीत बैठक होती. त्या बैठकीसाठी आम्ही सर्वजण दोन ते तीन दिवस दिल्लीत मुक्काम ठोकून होतो. शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः आमचं म्हणणं ऐकणार होते. सगळ्या राज्यांच्या प्रत्येक मतदारसंघांविषयीचं निरीक्षण ते बघणार होते आणि त्यांचं मत नोंदवणार होते. त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेहून थेट लँड झाले आणि आमच्या बैठकीला आले. ती बैठक साठेआठ तास चालली होती. या साडेआठ तासांमध्ये दोनदा चहा, एकदा कॉफी, मधे मधे छोटे-मोठे स्नॅक्स आम्हाला दिले जात होते. माझं बारीक लक्ष होतं. मोदीजी फक्त गरम पाणी पित होते. माझ्या लक्षात आलं की नवरात्र चालू आहे आणि मोदीजींचे नऊ दिवसांचे उपवास आहेत. हे बघून मी इतकी प्रेरित झाले. मी विचार केला की या व्यक्तीला स्वतःसाठी काय पाहिजे? ज्याला परिवार नाही म्हणून हिणवलं त्यांनी या देशालाच परिवार मानलं. देशासाठी प्रत्येक क्षण खर्ची घातला. सकाळी ४ वाजता उठून रात्री १२ वाजेपर्यंत अथक परिश्रम करणाऱ्या, तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने काम करणाऱ्या या नेत्याच्या जीवनातलं ध्येय तरी काय? तर त्यांचं ध्येय या देशासाठीच आहे. त्या दिवशी मनातले सगळे किंतू-परंतू गळून पडले आणि निश्चित केलं की या ध्येयाला आपण खारीचा वाटा म्हणून जोडलं जायचं.”

मोदीजी, तुम्ही जेन झीचे फ्रेंड झाला आहात-पंकजा मुंडे

“देशामध्ये उत्तम राजा असेल तरीही चुकीचे प्रकार घडत नाहीत असं नाही. पण त्या चुकीच्या प्रकारांविरोधात आवाज उठवताना आपल्या संस्कृतीचं भान न ठेवणं हे बरोबर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यादिवशी उपवास करुनही तुम्ही आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त तरतरीत होतात. त्याच दिवशी मला कळलं की तुम्हाला शिव्या दिल्या गेल्या तरीही त्यांना माफ करण्याचा मोठेपणा तुमच्यात कुठून येतो. हा मोठेपणा, हे श्रेष्ठत्व तुमच्याच वागण्यातून आलंय. जे कुणालाही कुठल्या तराजूत मोजून मिळवता येणार नाही. तुम्ही देशाला हवे आहात. आज तुम्ही व्हिडीओ केलात, जेन झी ला माय फ्रेंड्स म्हणालात, त्यामुळे तुमच्याबाबत असलेले प्रत्येकाचे नकारात्मक भाव गळून पडले असतील असा मला विश्वास आहे. तुम्ही आमचे फ्रेंड झाला आहात, तुम्ही त्या जेन झीचे फ्रेंड झाला आहात. तुम्ही चुकीचं वागणाऱ्यांना माफ करुन त्यांच्या आई वडिलांचेही फ्रेंड झाला आहात. तुम्ही देशाचे फ्रेंड आहात, देशाच्या विकासाचे फ्रेंड आहात, तुम्ही देशाच्या भविष्याचे फ्रेंड आहात. ईश्वर तुम्हाला चांगलं सुदृढ असं आरोग्य देओ आणि देशाला नकारात्मकतेपासून दूर करण्यापासून मुक्त असा तुमचा मार्ग राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना!”

असा व्हिडीओ पोस्ट करत पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्याविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच तुम्ही देशाच्या भविष्याचे आणि विकासाचे फ्रेंड आहात असंही म्हटलं आहे. पंंकजा मुंडे याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.