Nikhil Gupta Guilty Plea: खलिस्तानवादी आणि अमेरिकन नागरिक असलेल्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा अयशस्वी कट रचल्याचा आरोप असलेल्या भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांना अमेरिकेतील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. निखिल गुप्ता यांनी मॅनहॅटन फेडरल कोर्डात आपला गुन्हा कबूल केल्याचे निवेदन अमेरिकेच्या न्याय विभागाने जाहीर केले आहे. गुप्ताने एका भारतीय सरकारी कर्मचाराच्या निर्देशानुसार हत्येचा कट रचला होता. त्याला २९ मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

निखिल गुप्ता यांच्याविरोधात दाखल झालेल्या आरोपपत्रात त्यांना तीन गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले गेले आहे. हत्या करण्यासाठी भाडोत्री मारेकरी शोधणे, हत्या करण्याचा कट रचणे आणि मनी लाँडरिंग करणे असे तीन आरोप त्यांच्यावर आहेत. अमेरिकन मॅजिस्ट्रेट न्यायाधीश सारा नेटबर्न यांनी गुप्ताला दोषी ठरवले आहे. आता २९ मे २०२६ रोजी अमेरिकन जिल्हा न्यायाधीश व्हिक्टर मॅरेरो यांच्यामार्फत त्याला शिक्षा सुनावण्यात येईल.

‘निक’ नावाने ओळखला जाणाऱ्या ५३ वर्षीय गुप्ताला न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून अमेरिका सरकारच्या विनंतीने ३० जून २०२३ रोजी झेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली. त्याचे १५ जून २०२४ रोजी अमेरिकेकडे हस्तांतरण झाले.

न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यातील अमेरिकन ॲटर्नी ऑफिसच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गुप्ता हा भारतीय नागरिक असून तो भारताचा रहिवासी होता. त्याने यादव नामक भारतीय अधिकारी आणि इतरांशी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संपर्क साधताना स्वतःचे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्राचा तस्कर म्हणून वर्णन केले होते. यादव हे भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात काम करत होते, इथेच भारताची परराष्ट्र गुप्तचर सेवा आणि रॉच्या शाखा आहेत.

जून २०२४ मध्ये झेक प्रजासत्ताकमधून अमेरिकाला प्रत्यार्पण झाल्यापासून निखिल गुप्ता ब्रुकलिनमधील तुरुंगात होता. भारतीय सरकारी अधिकाऱ्याबरोबर मिळून अमेरिका आणि कॅनेडियन असे दुहेरी नागरिकत्व असेल्या पन्नूची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप अमेरिकन सरकारी वकिलांनी गुप्तावर ठेवला होता. प्रत्यार्पणानंतर गुप्ता याने स्वतःवरील आरोप फेटाळून लावले होते.

भारताने आरोप फेटाळून लावले

हे प्रकरण समोर आल्यानंतर भारताने पन्नूच्या हत्येच्या कटापासून स्वतःला वेगळे केले होते. सदर प्रकार सरकारी धोरणाविरुद्ध असल्याचे सरकारने म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाने हत्येच्या कटाशी संबंधित आरोपांना फेटाळून लावले आणि सर्व आरोपांना निराधार म्हटले होते.