Pantnagar University Food Poisoning Case: उत्तराखंडमधील गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहाच्या मेसमध्ये गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर १५० हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (फूड पॉइझनिंग) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, ५ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

‘स्पेशल’ मेनू आणि काही तासांतच गोंधळ!

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या ‘पटेल भवन’ या वसतिगृहात हा प्रकार घडला. या हॉस्टेलमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे सुमारे १८५ विद्यार्थी राहतात. बुधवारी रात्री विद्यार्थ्यांसाठी मेसमध्ये खास बेत आखण्यात आला होता. शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी पनीरची भाजी आणि मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी बटर चिकन, नान, भात आणि स्वीट डिश म्हणून रसमलाई असा ‘स्पेशल’ मेनू तयार करण्यात आला होता.

दोन तासांतच प्रकृती बिघडली…

जेवण झाल्यानंतर अवघ्या एक ते दोन तासांतच विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. एकामागून एक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडू लागल्याने हॉस्टेलमध्ये एकच घबराट पसरली.

रुग्णवाहिका आणि बसेसमधून विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवले

बाधित विद्यार्थ्यांचा आकडा झपाट्याने वाढू लागल्याने विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पावले उचलली. रात्रीच्या वेळीच उपलब्ध रुग्णवाहिका आणि बसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बहुतांश विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना हॉस्टेलमध्ये परत पाठवण्यात आले आहे. मात्र, ५ विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

“मेसच्या जेवणात आधीही सापडले होते किडे!” – विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप

या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी मेस चालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मेस कंत्राटदार नेहमीच निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आणि साहित्य वापरत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. “यापूर्वी किमान दोन वेळा जेवणात किडे सापडले होते,” अशी धक्कादायक माहितीही विद्यार्थ्यांनी दिली. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केली नाही, म्हणूनच आज एवढी मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

उच्चस्तरीय चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

घटनेची गांभीर्याने दखल घेत वसतिगृह अधीक्षक आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या सामूहिक अन्नबाधेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. अन्नाची गुणवत्ता खराब होती की जेवण बनवताना काही निष्काळजीपणा झाला, याचा तपास ही समिती करणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे.