सुमीत भाटियांनी त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाला म्हणजेच अभवला हे सांगितलं होतं की तू घरी पोहचत नाहीस तोपर्यंत फोनवर माझ्याशी बोलत राहा. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स यांच्यातली आयपीएलची मॅच पाहून अभव परतत होता. तो वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याशी बोलत होता. पण सुमीत भाटियांना हे माहीत नव्हतं की आपला अभवशी चाललेला हा शेवटचा फोन कॉल आहे. कारण अभव वडिलांना म्हणाला की आम्ही खूप मजा केली त्यानंतर दुसऱ्याच क्षणी त्याचा अपघात झाला. या अपघातात अभवचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपण जाणून घेऊ नेमकं काय घडलं?

नेमकी ही घटना काय घडली?

मंगळवारी साधारण १०.२७ च्या दरम्यान सुमीत भाटियांनी मुलगा अभवला फोन केला. अभव त्याचा चुलत भाऊ यज्ञसह आयपीएलची मॅच बघायला गेला होता. अभवने सुमीत यांचा फोन उचलला आणि त्यांना म्हणाला पपा आम्ही खूप एंजॉय केलं, खूप मजा आली. आम्ही आता अर्ध्या तासात घरी पोहचत आहोत. अभव त्याच्या वडिलांना हे सांगत होता कारण तो त्याच्या भावाच्या बाईकवर मागे बसला होता. सुमीत भाटिया मुलाला म्हणाले अभव फोन ठेवू नकोस, माझ्याशी बोल. त्यामुळे अभव त्यांच्याशी फोनवर बोलत होता. सुमीत यांनी मुलाला सामना पाहताना आलेला अनुभवही ऐकला. हे सगळं बोलणं सुरु होतं आणि तितक्यात पुढच्याच क्षणी एक मोठ्ठा आवाज आला. सगळं काही शांत झालं. सुमीत यांना काय घडलंय नीट कळलं नाही. त्यांनी पुन्हा अभवला फोन केला, पुन्हा पुन्हा फोन करत राहिले पण अभवने फोन उचलला नाही. काही वेळाने एका अनोळखी व्यक्तीने हा फोन वाजतोय पाहिलं आणि तो उचलला. सुमीत भाटिया यांना या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही ज्याच्याशी बोलत होतात त्याचा आणि त्याच्याबरोबर असलेल्या मुलाचा अपघात झाला आहे. अभव आणि यज्ञ ही दोन्ही मुलं दिल्लीतल्या अशोका रोड भागात एका ट्रकखाली आली होती. ट्रक त्यांच्या अंगावरुन गेला आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी ही घटना पाहिली आणि तातडीने पोलिसांना कळवलं.

Two Cousins Accidental Death in Delhi
अभव भाटिया आणि यज्ञ भाटिया या दोन चुलत भावांचा अपघाती मृत्यू (फोटो-सोशल मीडिया)

सुमीत भाटिया प्रचंड हळहळले

मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून सुमीत भाटिया प्रचंड हळहळले. ट्रकने आपल्या मुलाला आणि त्याच्या चुलत भावाला चिरडलं आहे आणि त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे हे त्यांना सहन झालं नाही. ते खूप रडत होते, त्यांच्या नातेवाईकांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली की सुमीत मुलाच्या वाढदिवसासाठी सरप्राईज बर्थ डे पार्टीची तयारी करत होते. पण त्या सगळ्या गोष्टी घडण्याआधीच ही अप्रिय घटना घडली. यज्ञच्या वडिलांनाही या घटनेचा प्रचंड धक्का बसला आहे. यज्ञला क्रिकेटर व्हायचं होतं. तो रसायन शास्त्राचा विद्यार्थी होता तरीही त्याला क्रिकेटची आवड होती. त्यामुळे त्याने महाविद्यालयातल्या क्रिकेट टीममध्ये भाग घेतला होता. यज्ञने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही क्रिकेट खेळतानाचे त्याचे आणि क्रिकेटशी संबंधित व्हिडीओ पोस्ट केले होते. त्याने RCB च्या टीमसह सेल्फी काढले होते. ती त्याची शेवटची पोस्ट ठरली असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं.

भाटिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर

यज्ञ आणि अभव यांचे मृतदेह राम मनोहर लोहिया रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्या मृतदेहांकडे पाहून यज्ञ आणि अभव या दोघांच्या वडिलांना रडू कोसळलं. अभव याचे वडील सुमीत भाटिया आणि यज्ञचे वडील शैलैंद्र भाटिया हे भाऊ आहेत. शैलेंद्र भाटिया यांचा चांदनी चौक भागात सुका मेव्याचा व्यवसाय आहे. सुमीत भाटियाही भावाला याच व्यवसायात मदत करतात. यज्ञ आणि अभव या दोघांच्या मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभव भाटिया सुमीत भाटियांचा एकुलता एक मुलगा होता. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो आनंद शोधत असायचा. तसंच तो अभ्यासातही हुशार होता. येत्या शनिवारी त्याचा वाढदिवस होता त्यामुळे सुमीत भाटिया त्याला सरप्राईज पार्टी देणार होते. पण त्याआधीच हा भीषण अपघात घडला. ज्यामुळे अभव आणि यज्ञ यांनी कायमचे डोळे मिटले.

अपघातानंतर ट्रक चालक फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. दरम्यान पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला आहे. नवी दिल्लीचे जिल्हा पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी ही माहिती दिली. सचिन शर्मा यांनी हे देखील सांगितलं की अपघाताची माहिती मिळताच आमचं पथक घटनास्थळी पोहचलं. अभव आणि यज्ञ दोघांचे मृतदेह तिथे होते. आम्ही अर्ध्या तासात घरी पोहचू हे अभवचं वाक्य शेवटचं ठरलं. तो वडिलांशी फोनवर बोलत होता. दरम्यान या दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं अशीही माहिती समोर आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अभव वडिलांशी फोनवर बोलत होता तेव्हाच भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या दोघांना धडक दिली आणि दोघांनी चिरडून पुढे गेला. ट्रक चालक फरार झाला आहे आम्ही त्याचा शोध घेत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली.