मध्य प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान असंसदीय शब्दांची यादी तयार करण्यात आली आहे. अध्यक्ष गिरीश गौतम यांनी ही यादी सादर केली असून या अधिवेशनादरम्यान या शब्दांवर बंदी घालण्यात आलेली आहे. पप्पू, व्हेंटिलेटर या शब्दांवरही बंदी घालण्यात आलेली आहे.

राज्य विधानसभेने काल म्हणजे रविवारी एक ३८ पानी पुस्तिका जारी केली आहे. या पुस्तिकेमध्ये असंसदीय ठरवलेल्या काही शब्दांचा, वाक्यांचा तसंच शब्दप्रयोगांचा समावेश आहे. यातील बहुतांश शब्द हे हिंदीमधील आहे. या पुस्तिकेमध्ये एकूण १,१६१ शब्द आणि वाक्यांचा समावेश करण्यात आला आहे. विधानसभा भवनात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी राज्याचे काँग्रेस अध्यक्ष कमल नाथ, नरोत्तम मिश्रा तसंच विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम हे उपस्थित होते.

ही पुस्तिका आज म्हणजे सोमवारी सर्व विधानसभा सदस्यांना अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दिली जाईल. जेणेकरून त्यांना सभागृहात कोणते शब्द वापरणं टाळायचं आहे हे लक्षात येईल, असं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

या यादीनुसार, पप्पू, मिस्टर बंटाधर, ढोंगी, निकम्मा, चोर, भ्रष्ट, तानाशाह, गुंडे, झुठ बोलना, व्याभिचार करना हे शब्द आणि वाक्य असंसदीय ठरवून त्यावर सभागृहात बंदी घालण्यात आली आहे. भाजपा समर्थक राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पप्पू हा शब्द वापरतात तर मिस्टर बंटाधर हे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासाठी वापरण्यात येतं.