बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्यावर दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना ‘माझ्या हत्येचा कट रचण्यात आला आहे’, अशी प्रतिक्रिया खासदार पप्पू यादव यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
खासदार पप्पू यादव हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत होते. मात्र, यावेळी काही व्यक्तींनी त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार पत्रकार परिषद सुरू असतानाच झाल्यामुळे पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
पप्पू यादव यांनी काय आरोप केले?
दिल्लीत पत्रकार परिषदेत झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या या घटनेवरून खासदार पप्पू यादव यांनी गंभीर आरोप केले आहेत. पप्पू यादव यांनी म्हटलं की, “माझ्यावर हल्ला करण्यासाठी माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न झाला आहे. तो व्यक्ती माझ्यावर चाकूने हल्ला करण्यासाठी आला होता.” या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
“यापूर्वी देखील मी अनेक एफआयआर अशा घटनांबाबत दाखल केलेले आहेत. माझे वकीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही कोणालाही घाबरणार नाहीत. ज्याला माझी हत्या करायची असेल त्याने करावी. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. पप्पू यादवचा गुन्हा काय आहे? खरा गुन्हा तर चंपत राय यांचा आहे. माझा गुन्हा काय आहे? मी काय चोरलं?”, असं खासदार पप्पू यादव यांनी म्हटलं आहे.
पप्पू यादव यांच्या वकिलांनी काय म्हटलं?
“या घटनेवरून हे स्पष्ट होतं की दिल्ली पोलिसांचं हे अपयश आहे. दिल्ली पोलिसांचं कारस्थानही यातून समोर येतं. सहा वेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीविरुद्धच्या कटात सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी हे कसे हातमिळवणी करत आहेत, हे यावरून दिसून येतं. या घटनेबाबत आता आम्ही तक्रार दाखल करत आहोत”, अशी प्रतिक्रिया पप्पू यादव यांच्या वकिलांनी दिली आहे.
पप्पू यादव यांनी पुजाऱ्याच्या वेशात केलं होतं आंदोलन
राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणावरुन विरोधकांनी आक्रमक होत संसदेच्या परिसरात राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचं नाट्य रुपांतर करुन सरकारवर टीका केली होती. राम मंदिरातील पुजाऱ्यांना दिलेली देणगी घेऊन पळून जातात अशा पद्धतीचे नाट्य यावेळी संसदेच्या परिसरात सादर करण्यात आलं होतं. पप्पू यादव आणि राहुल गांधींनी या छोट्याशा नाटीकेत सहभाग घेतला होता.
'चढ़ावा चोर – गद्दी छोड़'
— Congress (@INCIndia) July 31, 2026
– कांग्रेस अध्यक्ष व राज्यसभा में नेता प्रतिपक्ष श्री @kharge और नेता विपक्ष श्री @RahulGandhi की मौजूदगी में 'चढ़ावा चोरी' के खिलाफ विपक्ष के सांसदों का प्रदर्शन
? संसद परिसर pic.twitter.com/6r6YzN6J0v
संसदेच्या परिसरात सर्व विरोधी पक्षातील खासदारांनी एकत्र येत राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी निदर्शन केलं होतं. यावेळी देणगी गैरव्यवहार घटनेचं नाट्य रुपांतर करण्यात आलं होतं. खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेषातील कपडे परिधान करुन बसले होते. त्यांच्यासमोर दोन ते तीन देणगीच्या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी राहुल गांधी देणगी घेऊन येतात आणि दान पेटीत पैसे टाकतात, दरम्यान, दान पेटीत पैसे टाकल्यानंतर पप्पू यादव दानपेटी घेऊन पळून जातात, अशा पद्धतीने हे पथनाट्य सादर करण्यात आलं होतं. मात्र, यावरूनच पप्पू यादव यांच्यासह विरोधकांवर सत्ताधारी नेत्यांनी टीका केली होती.
