Pappu Yadav Controversial Remark Women Politics: अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘पुरुष राजकीय व्यक्तीच्या खोलीत वेळ घालवल्याशिवाय अनेक महिला राजकारणात येऊच शकत नाहीत’, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार यादव यांनी केले आहे. पुरुष राजकारणी गिधाडं असल्याचेही यादव म्हणाले. महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकावर भाष्य करत असताना खासदार यादव यांची जीभ घसरली.
महिला विधेयकावर बोलताना जीभ घसरली
गेल्या आठवड्यात महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले. आवश्यक बहुमत सरकारला न मिळल्याने घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकले नाही. विरोधकांनी डिलिमीटेशनचा मुद्दा उपस्थित करत हे विधेयकाला विरोध केला. यादव यांनी विधेयकावर मत मांडताना पुरुष राजकारण्यांना गिधडाची उपमा दिली. घरगुती हिंसाचार कोण करतंय? महिलांवर वाईट नजर कोण ठेवतंय? अमेरिका ते भारत, यात सर्व राजकीय नेते आहेत. पुरुष राजकीय नेत्याच्या रुममध्ये वेळ घालवल्याशिवाय ९० टक्के महिला राजकीय क्षेत्रात येऊच शकत नाहीत, असे खासदार पप्पू यादव म्हणाले.
महिलांना त्रास देण्याची संस्कृती – यादव
“हे दररोज घडतंय. राजकीय नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ रोज समोर येत आहेत. महिलांचा छळ करणे त्यांना त्रास देणे आजकाळ संस्कृती होऊ लागली आहे”, असे पप्पू यादव म्हणाले. बिहारमधील पूर्णियाचे खासदार असणारे पप्पू यादव यांच्यावर या विधानानंतर जोरदार टीका केली जात आहे. “यादव यांचे वक्तव्य विरोधकांची मानसिकता दर्शवते”, असे भाजापाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले.
भाजापाकडून टीका
पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी ते महिला विरोधी असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी महिला आरक्षणाच्या विरोधात केवळ मतदान केले नाही तर, राहुल गांधींच्या जवळ असणाऱ्या पप्पू यादव यांनी महिलांबाबत वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य केले आहे, असे पूनावाला म्हणाले. पूनावाला यांनी प्रियांका गांधी या वक्तव्यावर शांत का आहेत? असाही सवाल उपस्थित केला. यादव यांंचे वक्तव्य त्यांनी महिलांबाबतची मानसिकता दर्शवते, असे भाजपा नेते चारु प्रग्या म्हणाल्या.
महिला आयोगाची नोटीस
“अनेकवेळा संसदेत गेलेल्या नेत्याने असं वक्तव्य केलं आहे. त्यांचे निलंबित करुन त्यांना भविष्यात निवडणूक लढण्यास मनाई करायला हवी. राहुल गांधी आणि आरजेडी प्रमुख तेजस्वी यादव यांचे याबाबत काय मत आहे?”, असे सवाल चारु यांनी उपस्थित केला. दरम्यान, पप्पू यादव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, यादव यांच्यावर टीका केली जात आहे. वक्तव्याची दखल घेऊन बिहारच्या महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
