जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने जगातील ९६ नामांकित माध्यमसमूहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा करण्यात मोलाची कामगिरी बजावली. यामध्ये भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’चा समावेश होता. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उद्योग मंत्री विल्बर रॉस आणि त्यांचे रशियाशी असलेले संबंध ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आले आहेत. याशिवाय कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निधी संकलन करणाऱ्या व्यक्तीचे नावही या यादीत आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथची वैद्यकीय आणि ग्राहक कर्ज कंपन्यांमधील गुंतवणूकही या संपूर्ण तपासातून समोर आली आहे. यासोबतच ट्विटर आणि फेसबुकमधील रशियन कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या पडताळणीतही काळेबेरे असल्याचे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आले आहे.
सध्या अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना १९९० मध्ये विल्बर रॉस यांनी दिवाळखोरीत जाण्यापासून वाचवले होते. त्याचीच परतफेड ट्रम्प यांनी रॉस यांना उद्योग मंत्रालय देऊन केल्याचे बोलले जाते. रॉस यांची एका रशियन कंपनीत गुंतवणूक असल्याचे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघड झाले आहे. या कंपनीत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा जावई आणि अमेरिककडून निर्बंध घालण्यात आलेल्या दोघांची गुंतवणूक आहे. ट्रम्प यांच्या विजयात रशियाची भूमिका महत्त्वाची असल्याची चर्चा असताना हे प्रकरण उघडकीस आल्याने ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या निकटवर्तीयाचे नावही यामधून समोर आले आहे. ट्रुडो यांच्यासाठी निधी संकलनाचे काम करणाऱ्या व्यक्तीमुळे कॅनडाला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाल्याचे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ट्रुडो यांनी टॅक्स हेवन (कर नंदनवन) बंद करण्यासाठी अभियान राबवले आहे. मात्र आता त्यांच्याच जवळची व्यक्ती यामध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने ट्रुडो यांची मोठी नाचक्की झाली आहे.
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांचेही नाव ‘पॅराडाईज पेपर्स’ प्रकरणात समोर आले आहे. एलिझाबेथ यांनी जवळपास १ कोटी पाऊंड इतकी रक्कम परदेशात गुंतवली आहे. हा पैसा केमन आयलँड्स आणि बर्म्युडामध्ये गुंतवला गेल्याचे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आले आहे. हा पैसा करचोरी करुन परदेशात गुंतवण्यात आला होता का, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र महाराणीने अशाप्रकारे परदेशात गुंतवणूक करावी का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याशिवाय गरिबांच्या शोषणाचा आरोप असलेल्या ब्राईटहाऊस या रिटेल समूहातही एलिझाबेथ यांची गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.