Paramount 600 Employees Took Buyout Offer : अमेरिकेतील मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी पॅरामाऊंट स्कायडान्समधील तब्बल ६०० कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याचं कारणही समोर आलं आहे. कंपनीने वर्क फ्रॉम होम तथा रिमोट वर्किंगचं धोरण बंद करत कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात येण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

फॉर्च्यून मासिकाच्या अहवालानुसार सोमवारी (१० नोव्हेंबर) कंपनीने एक निवदेन जारी केलं आहे. त्यानुसार या ६०० कर्मचाऱ्यांनी कंपनीचे सीईओ डेव्हिड एलिसन यांनी दिलेली बायआउट ऑफर (स्वेच्छानिवृत्ती पॅकेज) स्वीकारली आहे. यामुळे कंपनीला या कर्मचाऱ्यांवर १८५ मिलियन डॉलर्स खर्च करावे लागले आहेत.

६०० कर्मचाऱ्यांनी स्वीकारलं सेव्हरन्स पॅकेज

पॅरामाऊंट आणि स्कायडान्स मीडिया या कंपन्यांचं ऑगस्ट २०२५ मध्ये आठ अब्ज डॉलर्समध्ये विलीनीकरण पार पडलं. त्यानंतर डेव्हिड एलिसन यांनी या नव्या मीडिया समुहाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर त्यांनी दूरस्थपणे (रिमोट वर्किंग/वर्क फ्रॉम होम) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितलं. तसेच कार्यालयात येऊन काम करण्याची तयारी नसेल तर तुम्ही सेव्हरन्स पॅकेज (भरपाईसह राजीनामा) स्वीकारू शकता असं सांगितलं. त्यानंतर कंपनीतील ६०० कर्मचाऱ्यांनी एलिसन यांची ही ऑफर स्वीकारत राजीनामा दिला आहे.

वर्क फ्रॉम होम बंद करण्याचं कारण काय?

फॉक्स न्यूज डिजीटलला लिहिलेल्या संदेशात एलिसन यांनी म्हटलं आहे की “माझा ठाम विश्वास आहे की प्रत्यक्ष कार्यालयात किंवा जे कामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी उपस्थित राहून काम करणं हे आपल्या व्यावसायिक यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. लोक एकत्र जमले की नवीन कल्पना जन्माला येतात, समस्या सोडवणं अधिक सोपं होतं. कर्मचाऱ्यांमध्ये विचारांची, नवकल्पनांची देवाणघेवाण होते. त्यातून नवनिर्मिती होते. एकमेकांना आव्हान द्यायला व दृढ नातेसंबंध निर्माण करायला ही स्थिती अनुकूल असते. यातून काम चांगलं होतं.”

“मी कंपनीच्या टाउनहॉलमध्ये सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात मी सर्वात जास्त कुठे शिकलो असेन तर ते इतर सहकाऱ्यांबरोबर एका खोलीत किंवा कॉन्फरन्स हॉलमध्ये शिकलोय. मी तिथे ऐकत आणि शिकत आलो आहे. मात्र, हीच गोष्ट मी कधी झूम मीटिंगमध्ये (व्हिडीओ कॉन्फरन्स) अनुभवली नाही. कार्यालयात एकत्रित येणं म्हणजे केवळ उपस्थित राहणं नव्हे, तर व्यवसायात सक्रीय सहभाग घेणं, एकमेकांना साथ देणं, सामूहिक गती वाढवण्यासह अनेक गोष्टी असतात.”

सेव्हरन्स पॅकेजवर कंपनीकडून कोट्यवधी डॉलर्सचा खर्च

एलिसन यांच्या ई-मेलनंतर लॉस एंजेलिस व न्यूयॉर्कमधील पॅरामाउंटच्या उपाध्यक्ष पदापर्यंतच्या तब्बल ६०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजना स्वीकारली आहे. या सर्हरन्स पॅकेजमुळे पॅरामाउंटला तब्बल १८५ मिलियन डॉलर्सचा खर्च आला आहे.