Parents Kill Son Over Drinking case update : गुजरातमध्ये आई-वडिलांनीच मुलाची हत्या करून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला आत्महत्या समजल्या जाणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, प्रत्यक्षात त्याच्याच आई-वडिलांनी केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. ही घटना ३० जून रोजी गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील गोंडल तालुक्यातील गुंडाळा गावात घडली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
शवविच्छेदन अहवालामुळे बनाव उघड
राम बाबुभाई बांभवा असं मृत तरुणाचं नाव असून, सुरुवातीला त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आणि पालकांचं क्रूर कृत्य उघडकीस आलं. वैद्यकीय अहवालानंतर, मृत तरुणाच्या अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीने आपल्या सासू-सासऱ्यांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली.
नेमकं काय घडलं?
पोलीस तपासानुसार, रामला दारूचं व्यसन होतं. यावरून त्याचे वडील बाबुभाई उर्फ अतुलभाई घुघाभाई बांभवा आणि आई मनीषाबेन उर्फ मोतीबेन यांच्याशी त्याचे वारंवार वाद होत असत. घटनेच्या दिवशी रामच्या व्यसनावरून त्याचे आई-वडिलांशी कडाक्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर, आईने रामला बळजबरीने अॅसिड पाजले, तर वडिलांनी त्याला बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केला.
हा गुन्हा लपवण्यासाठी आणि ती आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी वडील बाबुभाईने स्थानिक राजकीय प्रभावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये म्हणून गोंडल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पॅनेल शवविच्छेदन करण्यासाठी अनेक स्थानिक नेत्यांशी संपर्क साधून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी सखोल तपास आणि शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालाच्या आधारे हा कट उधळून लावला. विषबाधा आणि गळा आवळल्यामुळेच हा मृत्यू झाल्याचं तपासात निष्पन्न झालं. मृत तरुणाची पत्नी बंशीबेन बांभवा यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंडल पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून बाबुभाई आणि मनीषाबेन या दोन्ही पालकांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मृत रामच्या वडिलांचे स्थानिक स्तरावर चहाचे दुकान असून, राम हा चार भावंडांमध्ये सर्वात मोठा होता.
