Kerala Toddler Dies of Jaundice: केरळच्या मलप्पुरम येथे एका वर्षाच्या चिमुकल्याचा काविळ आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मृत बालकाच्या पालकांनी आधुनिक उपचार पद्धतींना नकार दिल्याच संशय व्यक्त केला जात आहे.
मृत मुलाचे नाव एसेन एरहान तर आईचे नाव हिरा हरीरा आणि वडिलांचे नाव नवाज असे आहे. हे कुटुंब मलप्पुरमच्या कोट्टक्कल येथे राहते. लहान बाळाचा २७ जून रोजी मृत्यू झाला. लहान बाळाला वेळेवर योग्य उपचार मिळाले नसल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच मुलाची आई अॅक्युपंक्चर प्रॅक्टिशनर आहे. तिने मागच्या काळात आधुनिक उपचारांना विरोध करणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्ट आता चर्चेत आहेत.
दरम्यान मृत मुलाचा दफनविधी झाल्यानंतर पोलिसांनी आता शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पुन्हा बाहेर काढला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आता पुढील कारवाई निश्चित केली जाईल.
एप्रिलमध्ये मलप्पुरमध्येच एका दुसऱ्या घटनेत ३५ वर्षीय अस्मा हिचा घरीच बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात महिलेचा पती सिराजुद्दीन याला सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सिराजुद्दीन मुदावर काफिला नावाचे युट्यूब चॅनेलही चालवतो. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पतीने एर्नाकुलममधील पेरुम्बवूर येथे अस्माचा मृतदेह गुप्तपणे दफन करण्याचा प्रयत्न केला.
मुदावर काफिला या युट्यूबवरील त्याच्या अनेक व्हिडीओमधून आरोपी सिराजुद्दीन याने बाळंतपणादरम्यान आधुनिक वैद्यकीय सेवेविरुद्ध चुकीची माहिती पसरविल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.