Paris Train Station : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे एका अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर दुसर्या महायुद्धातील एक न फुटलेला बॉम्ब आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर गारे डू नॉर्ड (Gare du Nord) रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. हा बॉम्ब सापडल्यानंतर रेल्वे स्थानकावरील वाहतूक थांबवण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
नेमकं काय झालं?
सेंट-डेनिस उपनगरिय भागात मध्यरात्री नियमित देखरेखीच्या काम सुरू असताना रुळांच्या मध्ये स्फोटके सापडल्याची माहिती फेंच नॅशनल रेल्वे कंपनी एसएनसीएफ (SNCF) ने दिली आहे. दरम्यान उपनगरीय RER B रेल्वे सेवेने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा बॉम्ब दुसर्या महायुद्धातील असल्याची माहिती दिली आहे.
गारे डू नॉर्ड हे प्रमुख युरोपियन ट्रान्झिट हब आहे, फ्रान्सच्या उत्तरेकडील अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणांकडे जाण्यासाठी याचा वापर होतो. EU राजधानी, ब्रुसेल्स आणि नेदरलँड्स याससह पॅरिस येथील मुख्य विमानतळ या ठिकाणांकडे जाण्या-येण्यासाठी हे रेल्वे स्टेशन वापरले जाते.
दरम्यान बॉम्ब सापडल्यानंतर फ्रेंच प्रशासकीय अधिकार्यांनी ताबडतोब गेरे डू नॉर्ड येथे येणारी आणि जाणारी रेल्वेची वाहतूक थांबवली. तसेच हायस्पीड टीजीव्ही आणि युरोस्टार सेवा देखील थांबवण्यात आली. दररोज अंदाजे ७००,००० प्रवाशी या टर्मिनलमधून प्रवास करतात. मात्र पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारे तज्ञ हा बॉम्ब निकामी करण्यासाठी काम करत असल्याने या कालावधीत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
युरोस्टारच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार खबरदारी म्हणून सकाळच्या वेळच्या तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या. यामुळे लंडन, ब्रुसेल्स आणि इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात उशीर झाला. दुसर्या महायुद्धातील न फुटलेले बॉम्ब युरोपमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम करताना अधूनमधून सापडल्याच्या घटना घडत राहतात. असे असले तरी रेल्वे रुळांवर आढळलेला बॉम्ब कुठून आला याबद्दल अधिकाऱ्यांनी अद्याप माहिती दिली आहे.
सीन-सेंट-डेनिस येथे रेल्वे रुळाजवळ पहाटे ४ वाजता माती उकरण्याचे सुरू होते, यावेळी कामगारांना बॉम्ब आढळून आला. यानंतर माइनस्वीपर घटनास्थळी पाठवण्यात आले. यादरम्यान स्टेशनवर अडकेल्या प्रवाशांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मागे राहिलेले बॉम्ब फ्रान्समध्ये यापूर्वीही अनेकदा आढळून आले आहेत. मात्र इतक्या गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब सापडल्याच्या घटना दुर्मिळ असल्याचे मिडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.