पॅरिस : युरोपियन फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकल्यानंतर पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) क्लबच्या चाहत्यांनी जल्लोष केला; मात्र या उत्साहाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. पोलीस आणि दंगेखोरांमध्ये झालेल्या चकमकींमध्ये २१९ जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट न्यूनेझ यांनी रविवारी दिली.

पीएसजीने अंतिम सामन्यात विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर हजारो चाहते पॅरिसच्या रस्त्यांवर उतरले. शहरातील अनेक भाग फटाके, धूरब़ॉम्ब आणि घोषणांनी वातावरण दणाणून गेले. मात्र काही ठिकाणी जमावाने रस्त्यांवरील दुचाकी आणि इतर वाहनांची जाळपोळ केली, तर दुकानांच्या काचाही फोडल्या. रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. या कारवाईत ५७ पोलीस कर्मचारी जखमी झाले. देशभरातून एकूण ७८० जणांना अटक करण्यात आली असून ४५० हून अधिक संशयितांना कोठडीत ठेवण्यात आले आहे. यामध्ये पॅरिसमध्ये अटक झालेल्यांची संख्या ४८० एवढी आहे.

‘पीएसजी’च्या विजयी मिरवणुकीसाठी कडक बंदोबस्त

रविवारी होणार्‍या विजयी मिरवणुकीसाठी प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली असून, आयफेल टॉवर परिसरात सुमारे सहा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यावेळी ‘पीएसजी’च्या फुटबॉलपटूंच्या सत्कारासाठी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत. बहुसंख्य चाहते शांततेत आनंद साजरा करतात, मात्र काही समाजकंटक केवळ गोंधळ घालण्यासाठी गर्दीत मिसळतात. त्यांच्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल. – लॉरेंट न्यूनेझ, गृहमंत्री, फ्रान्स