नवी दिल्ली : जंतर-मंतरवरील आंदोलकाचे तीव्र पडसाद बुधवारी संसदेमध्ये उमटले. लोकसभेमध्ये मोर्चातील पोलिसांच्या मारहाणीच्या मुद्द्यावर दिलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी करत काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले.
केंद्र सरकार नीटच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर किती तास चर्चा करायची याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा न करण्याची काँग्रेस व विरोधकांची भूमिका योग्य नाही, असे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले. मात्र, काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी आक्षेप घेतला.
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस व भाजपच्या सदस्यांना बोलण्याची मुभा दिल्यामुळे संतप्त झालेले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी, काँग्रेस आणि भाजप यांची हातमिळवणी झाली आहे का, केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा कधीही घेता येऊ शकतो पण, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आधी चर्चा झाली पाहिजे, असा मुद्दा यादव यांनी सभागृहात मांडल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीमध्येच मतभेद झाल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, संसदेच्या आवारात, अखिलेश यादव यांनी, काँग्रेसशी मतभेद नाही.
मोदींच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा निरोप आल्यावर आम्ही तातडीने पोहोचले होतो, असे यादव म्हणाले. आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मग चर्चा, अशी भूमिका नंतर यादव यांनी घेतली. राज्यसभेतही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या मारहाणीवर चर्चेची मागणी सभागृहात लावून धरली. या मुद्द्यावरून संसदेची दोन्ही सभागृहे वारंवार तहकूब झाली. पोलसांच्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी बुधवारी काळा दिवस पाळला. संसदेमध्ये विरोधी पक्षांचे सदस्य काळे कपडे घालून आले होते.
देशभरातून विद्यार्थी दाखल
जंतर-मंतरवरील आंदोलकांनी ठिय्या दिला असून दिवसागणिक आंदोलकांची संख्या वाढू लागली आहे. दिवसाच नव्हे तर रात्रीही जंतर-मंतरचा परिसर पूर्णपणे आंदोलकांनी व्यापलेला दिसू लागला आहे. देशाच्या विविध राज्यांतून विद्यार्थी जंतर-मंतरवर पोहोचू लागले आहेत. गर्दीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी व धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात घोषणाबाजी होत असल्या तरी काही नकारात्मक घोषणाही दिल्या गेल्या. ‘सीजेपी’ने आंदोलन बेशिस्त होऊ नये याची दक्षता घेतल्याचे पाहायला मिळाले. ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय भीम’ आणि ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’, फक्त या चारच घोषणा देण्याचे आवाहन ‘सीजेपी’च्या वतीने आंदोलकांना केले गेले.
आंदोलकांबद्दल सहानुभूतीही वाढू लागली आहे. आंदोलनामध्ये वा मोर्चामध्ये सहभागी न झालेल्या अनेक आपल्या परीने आंदोलकांना मदत करत असल्याचे दिसले. गेले दोन दिवस दिल्लीत पाऊस असल्यामुळे जंतर-मंतरच्या परिसरात चिखल झालेला आहे तरीही आंदोलकांनी जमिनीवर ठाण मांडलेले आहे. हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अव्याहतपणे स्वयंसेवक काम करत आहेत.
आंदोलकांसाठी गरज लागल्यास प्रथमोपचार आणि औषधांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. जंतर-मंतर आंदोलकांचा प्रचंड ओघ असल्यामुळे सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. जंतर-मंतर व आसपासच्या संसद मार्ग, कॅनॉट प्लेस, अशोका रोड, रायसिना रोड, संसद परिसर, कर्तव्य पथ, दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप व काँग्रेसचे मुख्यालय अशा विविध ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
