भारतीय संसदेवरील हल्लाप्रकरणात न्यायालयाकडून दोषी ठरवून फाशी देण्यात आलेला दहशतवादी अफजल गुरूच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. जम्मू-काश्मीर शालेय बोर्डाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये अफजलचा मुलगा गालिब गुरू याला ९५ टक्के गुण मिळाले आहेत. एकुण ५०० गुणांच्या या परीक्षेत गालिबने ४७४ गुण मिळवले असून त्याला सर्व विषयांमध्ये ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. अफजल गुरूच्या मुलाचे हे यश सोशल मिडीयावर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवल्याबद्दल फुटिरतावाद्यांकडूनही गालिबचे कौतुक करण्यात आले आहे. संसद हल्ल्यातील सहभागप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अफजल गुरूला २०१३ मध्ये फाशी देण्यात आली होती. त्याच्या फाशीवरून बराच गदारोळ झाला होता.