संसदेवरील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सुरक्षारक्षकांच्या कुटुंबीयांनी सरकारला परत केलेल्या शौर्यपदकांचा शनिवारी पुन्हा स्वीकार केला. या हल्ल्याचा मुख्य आरोपी अफझल गुरू याला फाशी देण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ या कुटुंबीयांनी शौर्यपदके सरकारला परत केली होती.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते आठ हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी पदके पुन्हा स्वीकारली. अफझल गुरू याला गेल्या महिन्यात फाशी देण्यात आल्याने पदके पुन्हा स्वीकारण्याचा निर्णय कुटुंबीयांना घेतला.
केंद्रीय राखीव पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल कमलेशकुमारी यांची कन्या श्वेता हिने सांगितले की, आपण आईसाठी येथे आलो आहोत. राष्ट्रपतींनी गुरूचा दयेचा अर्ज फेटाळला त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत, असे श्वेता हिने सांगितले. आपली आई शहीद झाली त्याचा हा सन्मान आहे, असेही तिने सांगितले.
दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष बिट्टा यांनी, पदके पुन्हा दिल्याबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानले. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांतसिंग यांच्या मारेकऱ्यांना ठोठाविण्यात आलेल्या शिक्षेची त्वरेने अंमलबजावणी करावी, अशी विनंतीही या वेळी बिट्टा यांनी राष्ट्रपतींना केली.