Parliament Budget Session 2026 : सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून वेगवेगळ्या मुद्यांवरून हे अधिवेशन चांगलंच गाजत आहे. विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर विरोधकांच्या आरोपाला सत्ताधारी उत्तर देत आहेत. मात्र, या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एकत्रितपणे केलेली घोषणाबाजी, निदर्शने आणि फलकबाजीमुळे निर्माण झालेल्या गदारोळामुळे बुधवारी पंतप्रधान मोदी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेवरील उत्तराचं भाषण करता आलं नाही.
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाविना सभागृहाचं कामकाज बुधवारी संध्याकाळी पाचनंतर तहकूब करण्यात आलं. तसेच राहुल गांधी यांना त्यांच्या भाषणावेळी काही मुद्यांवर लोकसभेच्या अध्यक्षांनी बोलू न दिल्याचा आरोप करत आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सवाल उपस्थित केले. ‘राहुल गांधी यांच्या बोलण्याने सरकार का त्रस्त आहे?’ असे अनेक सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारले.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या या सवालानंतर केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि निर्मला सीतारमण यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘काँग्रेस पक्ष अबोध बालकाचा बंधक करू नका’, अशी टीका नड्डा यांनी केली. त्यांच्या या टीकेनंतर खर्गेंनी संताप व्यक्त करत जोरदार निशाणा साधला. तसेच लोकसभेत पंतप्रधान मोदींचं उत्तराचं भाषण रखडल्याने राज्यसभेतही मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आणि विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपावरून जोरदार खडाजंगी झाली.
मल्लिकार्जुन खरगे यांनी काय सवाल केले?
आज राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले. खरगे म्हणाले की, “राहुल गांधी यांच्या बोलण्याने सरकार का त्रस्त आहे? केंद्र सरकार नेमकं काय लपवू पाहत आहे? लोकसभेत राहुल गांधी यांना का बोलू दिलं जात नाही?”, असे प्रश्न खरगे यांनी विचारले. तसेच पंतप्रधान मोदींच्या लोकसभेतील उत्तराच्या भाषणाच्या मुद्यांवर बोलताना ‘गेल्या चार दिवसांपासून सभागृहाचं कामकाज होत नाहीये’, असं खरगे यांनी म्हटलं.
जे.पी.नड्डा यांनी काय म्हटलं?
मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेल्या सवालाच्या अनुषंगाने बोलताना जे.पी.नड्डा यांनी म्हटलं की, “सरकार सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे. मात्र, लोकसभेच्या सभागृहाचं कामकाज विरोधकांनी चालू दिलं नाही आणि आता लोकशाही धोक्यात आहे असं बोलणं चुकीचं आहे. तसेच लोकसभेच्या कामकाजावर राज्यसभेत चर्चा करता येत नाही, हे विरोधकांना माहिती असलं पाहिजे”, असं म्हणत जे.पी.नड्डा यांनी जोरदार टीका केली.
किरण रिजिजू यांनी काय म्हटलं?
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहातील गोंधळावर भाष्य करत राज्यसभेतील खासदारांनी सभागृहाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. रिजिजू म्हणाले की, “आज मी अपेक्षा करत आहे की सर्व खासदार सभागृहाच्या नियम आणि परंपरांचं पालन करतील. सर्व खासदार आज पंतप्रधानांचं भाषण ऐकण्याची वाट पाहत आहेत. जरी काँग्रेस पंतप्रधानांचं भाषण ऐकू इच्छित नसेल, तरी इतर सर्व सदस्य ऐकू इच्छित आहेत.”
तसेच किरण रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्याबाबत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांना म्हणाले की, “आज चार दिवस झाले आहेत, राहुल गांधी सभागृहाचे नियम पाळत नाहीत. मग तुम्ही त्यांना समजावून का सांगत नाहीत?”

