Parliament Makar Dwar Protest updates : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गुरुवारी सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी आमनेसामने येत जोरदार निदर्शने केली. दोन्ही बाजूंच्या खासदारांनी संसदेतील मकर द्वार येथे एकत्र येत आपापल्या राजकीय भूमिका मांडल्या. या गोंधळातच लोकसभा आणि राज्यसभेतही गोंधळ झाला. त्यामुळे कामकाज तासाभरासाठी स्थगित करावं लागलं.

संसद परिसरातील मकर द्वार येथे एनडीए आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी एकाच वेळी आंदोलन केलं. यामुळे चालू राजकीय संघर्षात हे प्रवेशद्वार मुख्य केंद्र बनलं. एनडीए खासदारांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली, तर इंडिया आघाडीच्या खासदारांनी पावसाळी अधिवेशनात सातत्याने मांडत असलेल्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरत प्रति-आंदोलन केलं. या परस्परविरोधी आंदोलनांमुळे संसदेतील वातावरण कमालीचे तापलं होतं.

संसद परिसरातील आंदोलन संपल्यानंतर खासदार आप-आपल्या सभागृहात परतले. लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि नीट प्रकरणावरून चर्चा व्हावी, ही मागणी त्यांना लावून धरली. परिणामी या गोंधळात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज तासाभरासाठी स्थगित केलं. तर, राज्यसभेतही विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तासाभरासाठी थांबवावं लागलं.

रणदीप सुरजेवाला यांची नीट लीक प्रकरणावर चर्चेची मागणी

काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनीही राज्यसभेत नियम २६७ अंतर्गत नोटीस सादर केली. कथित ‘नीट’ पेपर लीक प्रकरण, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली पोलीस कारवाई आणि व्यापक शैक्षणिक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी दिवसाचे नियोजित कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. आपल्या नोटीसमध्ये सुरजेवाला यांनी म्हटले, “मी राज्यसभेच्या कामकाज नियमावलीतील नियम २६७ अंतर्गत, आजचे कामकाज स्थगित करून या महत्त्वाच्या विषयावर चर्चा घेण्याचा प्रस्ताव मांडण्याची नोटीस देत आहे.”