नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी, लोकसभा संस्थगित होताना मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले. यावेळी सभागृहात त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते. मात्र, सभागृहाचे कामकाज होताच राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ वाजवले गेले. त्यानंतर विरोधकांच्या गोंधळातच लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली गेली. त्यामुळे या अधिवेशनामध्ये नीट व विद्यार्थी आंदोलकांवरील पोलिसी अत्याचारावर चर्चा झाली ना शहांनी सभागृहात उत्तर दिले.
राज्यसभेमध्ये खाण व खनिज विकास नियमन दुरुस्ती विधेयक गोंधळातच संमत करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत बुधवारी संमत झाले होते. वरिष्ठ सभागृहामध्ये शेवटच्या दिवशीही शहांच्या विरोधात घोषणाबाजी जाली. मोदी व शहा लोकसभेत उपस्थित राहिले. मात्र, राज्यसभेत ते शेवटच्या दिवशीही आले नाहीत या मुद्द्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी केली. २० जुलै रोजी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या मोर्चानंतर मोदी व शहा एकदाही राज्यसभेत उपस्थित राहिले नाहीत. लोकसभेत अखेरच्या दिवशी सभागृह संस्थगित होताना परंपरा म्हणून ते उपस्थित राहिले.
माफी मागा, माफी मागा
लोकसभेचे कामकाज सुरू होण्याआधी काही मिनिटे अमित शहा लोकसभेच्या सभागृहात येऊन दाखल झाले. त्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी शहांना उद्देशून ‘माफी मागा, माफी मागा,’ असा घोषणा देण्यास सुरुवात केली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. मात्र, शहांनी त्यांना खाली बसण्याची सूचना केली.
‘लोकच अहंकार मोडून काढतील’ “संपूर्ण अधिवेशनामध्ये ना मोदी ना शहा सभागृहात आले. ते संसदेत येत होते, काय चालेल आहे ते ऐकत होते पण, ते सभागृहात आले नाहीत. संसद आपल्या समोर काहीच नाही असे त्यांना वाटते, ते म्हणजेच सर्वकाही आहेत असा त्यांचा समज आहे. त्यांना देशातील लोकशाही संपुष्टात आणायची आहे. त्यांचा अहंकार देशातील लोक मोडून काढतील,” अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केली.
‘विरोधकांनी पळ काढला’
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी मात्र विरोधकांच्या गोंधळावर तीव्र आक्षेप नोंदवला. “पावसाळी अधिवेशन संपले, कायदेविषयक कामकाजाच्या दृष्टीने हे अधिवेशन चांगले होते, अनेक विधेयके मंजूर झाली. मात्र, चर्चेच्या दृष्टीने हे अधिवेशन चांगले ठरले नाही, अशी टिप्पणी रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत केली. लोकसभेची कार्यक्षमता १९टक्के तर, राज्यसभेची कार्यक्षमता ३९ टक्के इतकी नोंदवली गेली. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच विरोधकांना चर्चेपासून पळ काढताना पाहत आहे. लोकशाहीसाठी ही बाब चांगली नव्हे,” असे रिजिजू म्हणाले.
चहापानावर बहिष्कार
अधिवेशन संपल्यावर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनामध्ये विरोधी पक्षनेते व पंतप्रधान चहापानासाठी एकत्र येतात पण, त्या चहापानावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. मात्र द्रमुकच्या नेत्या कणीमोळी मात्र उपस्थित होत्या. यावेळी मोदी, शहा व इतर मंत्रीही उपस्थित होते. राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या चहापानाला काँग्रेसचे नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आदी विरोधी पक्षनेते उपस्थित होते.
