नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी (२० जुलै) कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) ‘चलो संसद’ मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, असे दिल्ली पोलिसांनी रविवारी स्पष्ट केले. तरीही हा मोर्चा काढला गेला तर पोलिसांकडून तो अडवला जाईल. आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते. त्यामुळे मोर्चावेळी तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आंदोलनाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मोर्चातही मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जंतर-मंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, प्रमुख प्रवेशद्वारांवर बॅरिकेडिंग वाढवून कसून तपासणी सुरू आहे.
सीजेपीने या मोर्चासाठी लेखी परवानगी मागितली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. शिवाय सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्यामुळे मोर्चाला परवानगी दिली जाणाची शक्यता नाही.
मोर्चासाठी आंदोलकांना सकाळी ९ वाजता जंतर-मंतरवर येण्याचे आवाहन सीजेपीने केले असल्याने पोलिसांकडून त्यांना अडवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वांगचुक यांचे आवाहन
सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलेले वांगचुक यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करत हे आंदोलन म्हणजे दुसरा स्वातंत्र्यलढा आहे, असे निवेदन प्रसिद्ध केले आहे.
बेकायदा मोर्चावर कारवाई- दिल्ली पोलीस
नवी दिल्ली : नवी दिल्ली भागात कलम १६३ म्हणजे जमावबंदी लागू असल्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी परवानगीशिवाय मोर्चा, निदर्शने किंवा सभा घेण्यास बंदी आहे. फक्त जंतर-मंतर येथे, आधी परवानगी घेऊनच आंदोलन करता येईल, असे पोलिसांनी निवेदनात नमूद केले आहे. सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बेकायदेशीर मोर्चे किंवा जमावात सहभागी होऊ नका आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
अश्रुधुराच्या नळकांड्या
* लोकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, वॉटर कॅनन यांची जय्यत तयारी केलेली आहे.
* शीघ्र कृतिदलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. रविवारी पोलिसांनी आंदोलकांना जंतर-मंतर रिकामे करण्यास सांगितले होते. मात्र, गर्दी वाढत गेली. अशीच गर्दी सोमवारीही होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलीस खबरदारी घेत आहेत.
विशेष सुरक्षा तैनात
1) नवी दिल्ली, मध्य दिल्ली आणि उत्तर दिल्लीतील काही भागांमध्ये बहुस्तरीय बॅरिकेड्स, सीसीटीव्ही निगराणी, बॉम्बशोध पथकांकडून तपासणी आणि गस्त वाढवली आहे.
2)जंतरमंतर, संसद मार्ग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी विशेष सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
3)कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
