Parliament Session 2025 JP Nadda vs Sonia Gandhi : काँग्रेसच्या रॅलीमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींची कबर खोदण्याच्या घोषणेवरून राज्यसभेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन चालू असून भाजपाचे अध्यक्ष तथा खासदार जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत बोलत असताना काँग्रेसच्या रॅलीमधील पंतप्रधान मोदींच्या विरोधातील घोषणांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली. तसेच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तथा राज्यसभा सदस्य सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

जे. पी. नड्डा म्हणाले, “अत्यंत जड अंतःकरणाने मी एका गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वळवू इच्छितो. काल काँग्रेसच्या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधातील घोषणा ऐकायला मिळाल्या, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नहीं तो कल खुदेगी’, अशा घोषणा दिल्या गेल्या. या घोषणांवरून काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि मानसिकता आपल्या लक्षात येते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत उच्चारलेल्या या शब्दांबद्दल सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांची माफी मागायला हवी.

राज्यसभेचं कामकाज तहकूब

काँग्रेसच्या रॅलीमधील पंतप्रधान मोदींविरोधातील घोषणांचा उल्लेख करत जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. सत्ताधारी खासदारांनी ही मागणी लावून धरली. विरोधकांकडून यावर कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे भाजपा खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केला. परिणामी सभागृहाचं कामकाज तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं.

“अशा वक्तव्यांमधून काँग्रेसच्या नामदार नेत्यांची तडफड स्पष्ट झाली आहे. पंतप्रधानांविरोधात अशा प्रकारचे शब्द वापरणे, त्यांची कब्र खुदेगी अशा आशयाची वक्तव्ये करणे अत्यंत निंदनीय आहे. या घोषणांबद्दल आपले विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागायला हवी. कारण कांग्रेसने या देशाच्या राजकारणाचा स्तर खूपच खाली नेला आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतके ते खाली गेले आहेत. काँग्रेसवाल्यांच्या या घोषणेचा मी तीव्र शब्दांत निषेध नोंदवतो.”

राज्यसभेपाठोपाठ लोकसभेचं कामकाज स्थगित

दुसऱ्या बाजूला, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू याच घोषणांचा लोकसभेत उल्लेख करत काँग्रेसला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यांना सत्ताधारी खासदारांचं पाठबळ मिळालं. परिणामी लोकसभेतही मोठा गोंधळ झाला. स्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगिती केलं आहे.