घराला आग लागली असताना आपल्या किशोरवयीन मालकाचे प्राण वाचवताना पोपटाने बलिदान केल्याची घटना ब्रिटनमधील दक्षिण वेल्स परगण्यातील लानेली येथे घडली आहे. मालकासाठी प्राणार्पण करणाऱ्या या पोपटाचे नाव ‘कुकी’ असे आहे. लानेली येथील घरात बेन रीस हा किशोरवयीन मुलगा एकटा राहत होता, त्याच्या शयनगृहात ही आग लागली होती. आग लागल्यानंतर या कुकी नावाच्या पोपटाने खूप कलकलाट करून मालकाला म्हणजे त्या किशोरवयीन मुलाला सावध केले, नंतर या मुलाने स्वत:ची सुटका करून घेऊन सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. पण कुकी मात्र सुटका करून घेऊ शकला नाही. तो या आगीत मरण पावला. बेन हा त्या घरात एकटाच राहत होता व तो शॉवर घ्यायला गेला होता. दरम्यान शयनगृहात लावलेल्या उदबत्तीच्या ठिणग्या इतरत्र पसरून आग लावली तेव्हा या पोपटाने कलकलाट करून बेनला सावध केले. त्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले पण ती विझवता आली नाही. नंतर तो घरातून पळून गेला. त्याला अग्निशमनदलांनी ऑक्सिजन दिला व उपचारही केले. नंतर अग्निशामक जवानांनी आग आटोक्यात आणली पण कुकी नावाचा पोपट मात्र यात मृत्युमुखी पडला. त्याचे घराच्याच बागेत दफन करण्यात आले.