नवी दिल्ली : राहुल गांधी हे देशविरोधी ‘टूलकिट’चा कायमस्वरूपी भाग असल्याची टीका शुक्रवारी भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. लंडनमधील विधानांबद्दल राहुल गांधींना भाजपच्या कनिष्ट नेत्यांनी लक्ष्य केले होते. मात्र, नड्डांनी ‘टूलकिट’चे काँग्रेसविरोधातील हुकमी अस्त्र बाहेर काढल्यामुळे केंद्रीय स्तरावरून देशव्यापी मोहिमेच्या सूचना मिळाल्याचे स्पष्ट झाले.
काँग्रेस पक्ष देशविरोधी कारवायांमध्ये गुंतला आहे, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. देशातील मतदारांनी वारंवार नाकारल्यानंतर राहुल गांधी राष्ट्रविरोधी ‘टूलकिट’चा कायमचा भाग बनले आहेत, असा आरोप नड्डांनी केला. राहुल गांधींवर टीका करणारी चित्रफीत नड्डांनी शुक्रवारी समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली. काँग्रेस आणि पाकिस्तानची भारतविरोधी भाषा एकसारखीच आहे. राहुल गांधी, उद्योजक जॉर्ज सोरोस हे दोघेही एकाच भाषेत कसे बोलतात, असा प्रश्न नड्डांनी उपस्थित केला.
गुजरात दंगलीसंदर्भातील ‘बीबीसी’चा माहितीपट हा मोदींची बदनामी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘टूलकिट’चा हिस्सा असल्याची टीका भाजपने केली होती. २०२१ मध्ये वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिला ‘टूलकिट’ प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसविरोधात भाजपने कथित ‘टूलकिट’विरोधात देशभर वातावरण निर्मिती करण्याचे ठरवले आहे. दुसऱ्या देशाकडून भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणे हा भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. राहुल गांधींनी भारताचा, संसदेचा, परदेशातील भारतीयांचा अपमान केला. हे देशाविरुद्ध काम करणाऱ्यांना बळ देण्याजोगे आहे, असा दावा नड्डांनी केला.
राहुल गांधी देशद्रोही कसे : खरगे
लोकशाहीवरील चर्चेत कोणी बोलले तर ती व्यक्ती देशद्रोही ठरले का, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नड्डांना दिले. ‘काय पाप केले म्हणून आम्ही भारतात जन्माला आलो असे भारतातील लोक म्हणतात’, अशी विधाने मोदींनी परदेशात केली होती. ही विधाने देशद्रोही नव्हती का? भाजप देशविरोधी असून ब्रिटिश राजवटीची चाकरी करण्यात धन्यता मानणारे हे लोक आम्हाला देशप्रेम शिकवत आहेत. राहुल गांधींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. संसदेत संधी दिली तर ते बोलतील, असे खरगे म्हणाले.