देशातल्या काही धार्मिक स्थळांबाबत असलेला वाद आणि त्यावर शांतीपूर्ण मार्ग काढण्यासाठी पाऊल उचलत सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीतील ज्ञानवापी मशिद वाद, मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद आणि संभल येथील जामा मशिद वाद या प्रकरणांसाठी एका विशेष लोक न्यायालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या परिसरात २१ ते २३ ऑगस्ट या कालावधीत हे लोक न्यायालय स्थापन केलं जाईल.

सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे?

सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही धार्मिक स्थळांच्या वादांबाबत सगळ्या पक्षकारांना एक पत्र लिहिलं आहे. सुप्रीम कोर्ट अॅक्शन फॉर मीडिएट एडजुडिकेशन अँड डिस्प्युट्स हार्मोनायझेशन अक्रॉस नेशन समाधान समारंभ २०२६ च्या अंतर्गत तिन्ही धार्मिक स्थळांच्या वादाबाबत पक्षकारांनी शांतता पूर्ण तोडगा काढण्याचा विचार केला पाहिजे असं म्हटलं आहे. अर्थातच हा तोडगा सगळ्या पक्षकारांची सहमती असेल तरच निघू शकणार आहे. आता २१ ते २३ ऑगस्टच्या दरम्यान जे लोक न्यायालय भरवलं जाणार आहे त्यामध्ये या प्रकरणी तोडगा निघेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे समोर आलेल्या बातम्यांनुसार सगळ्या पक्षकारांनी सर्वानुमते तोडगा काढण्यास नकार दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात न्यायालयाने तोडगा काढावा आणि खटला चालवूनच काय तो निर्णय द्यावा. ज्ञानवापी वाद प्रकरणातील मुस्लिम पक्षकार अंजुमन इंतजामिया मशिद समितीने एक अधिकृत पत्रक काढलं आहे. त्यात मध्यस्थीने मार्ग काढावा हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला पर्याय नाकारण्यात आला आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.

अंजुमन इंतजामिया मशिद समितीने काय म्हटलंय?

विविध न्यायालयांनी प्रलंबित असलेल्या लाखो प्रकरणांचा बोजा कमी करण्यासाठी आणि परस्पर सहमतीने प्रकरणं मार्गी लावण्यासाठी समाधान समारंभ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्ञानवापीचा प्रश्न हा संवेदनशील आहे. आम्हाला या समारंभात बोलवण्यात आलं आहे. पण उपस्थित राहणं अनिवार्य नाही. आम्ही पक्षकार म्हणून या समारंभात भाग घेणार नाही.

संभल मशिद प्रकरणातील पक्षकारही सुवर्ण मध्य काढण्यास तयार नाहीत

सर्वोच्च न्यायालयात, अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९ मे २०२५ ला दिलेल्या निर्णयावर सुनावणी सुरु आहे. शाही जामा मशिद प्रकरणातील सिव्हिल प्रकरण पुढे नेण्यास संमती दिली गेली. अलाहाबाद कोर्टाने हे म्हटलं होतं की पूजा स्थळ (विशेष तरतूद) कायदा १९९१ च्या अंतर्गत हे सांगण्यात आलं होतं. यासंदर्भातली याचिका आठ हिंदू पक्षकारांनी मशिद १५२६ मध्ये कल्की मंदिर पाडून ही मशिद बांधली होती. त्यांनीही या प्रकरणी मध्यम मार्ग काढण्यास नकार दिला आहे. कृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह मशिद वादावर याचिकाकर्त्यांनी ईदगाह मशिद हटवण्याची मागणी केली आहे. ही मशिद औरंगजेबाने भगवान कृष्णाचं जन्मस्थळ असलेलं मंदिर पाडून बांधली होती. या प्रकरणात १८ याचिका दाखल आहेत.