नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी देशाच्या फाळणीच्या काळात उसळलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी ते म्हणाले, की भारतीय इतिहासातील हा फाळणीचा ‘अमानुष’ अध्याय कधीही विसरला जाणार नाही. ‘विभाजन विभिषिका स्मृती दिन’ युवा पिढीला देशवासीयांनी फाळणीच्या काळात सहन केलेल्या यातना आणि वेदनांची आठवण करून देईल व नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्यासाठी कायमच प्रेरित करेल.

शहा यांनी सांगितले, की  १९४७ फाळणीच्या काळात हिंसाचार आणि द्वेषाने लाखो निष्पापांचा बळी घेतला. लाखो नागरिक विस्थापित झाले. बेघर झाले. ‘विभाजन विभिषिका स्मृती दिना’निमित्त मी फाळणीचा फटका सहन केलेल्या लाखो नागरिकांना नमन करतो. पंतप्रधान मोदींच्या सरकारने फाळणीच्या वेळी नागरिकांनी केलेल्या त्याग, बलिदानास अभिवादन करण्यासाठी दर वर्षी १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिन पाळण्याची घोषणा केली होती.