पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी, प्रवक्ते आणि राज्य काँग्रेस युनिटचे वरिष्ठ मीडिया पॅनेल सदस्य प्रितपाल सिंग बालियावाल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना पक्षाची पंजाब युनिटची कमांड चुकीच्या हातात असल्याचे कारण त्यांनी दिले आहेत.

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामा पत्रात बालियावाल यांनी म्हटलंय की, “प्रवक्ता म्हणून पाकिस्तानशी संबंधांबद्दल मूर्खपणाची, पक्षविरोधी आणि सरकारविरोधी वक्तव्ये आणि विधाने यांचे समर्थन करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे.”

पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारत-पाकिस्तान मैत्रीमुळे व्यापार वाढेल, असे सांगत पाकिस्तानशी व्यापार चर्चेचे आवाहन केल्यानंतर बालियावाल यांनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान, बालियावाल यांनी राष्ट्रीय समन्वयक आणि हरियाणा आणि हिमाचल प्रदेश किसान काँग्रेसच्या प्रभारी पदाचाही राजीनामा दिला आहे.

“१५ वर्षापासून पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी विविध व्यासपीठांवर दिलेल्या जबाबदाऱ्यांचा मी सन्मान केला आहे. मात्र, आता पक्षाने पंजाबची कमान चुकीच्या हातात दिली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानशी संबंधांसह मूर्खपणाची, पक्षविरोधी, सरकारविरोधी केलेल्या वक्तव्याचा प्रवक्ता म्हणून बचाव करणे खूप कठीण झाले आहे,” असे बालियावाल यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

“२०२२ मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुनील कुमार जाखड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची आपल्या पक्षाची क्षमता होती. मुख्यमंत्री चरनजीत सिंग चन्नी पक्षाची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुम्ही सिद्धूची प्रवक्तेपदासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोज सिद्धू नवनवीन ट्वीट करून मुख्यमंत्र्यांचं महत्व कमी करत आहेत. अकाली राजवटीतही त्यांनी माझ्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि माझा व्यवसाय उद्ध्वस्त केला, पण तरीही आम्ही काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलो. पक्षाने जगदीश टायटलर यांना महत्वाचं पद दिल्याने मी पुन्हा दुखावला गेलो. म्हणून, मी राष्ट्रीय समन्वयक, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश किसान काँग्रेसच्या प्रभारी आणि पंजाब काँग्रेसच्या वरिष्ठ मीडिया पॅनेलच्या जबाबदारीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.