Party Worker Slaps Politician: राजकीय नेत्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ दिसते. नेत्याची मर्जी संपादन करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी फुलांच्या माळा, पुष्पगुच्छ आणतात. पण काही कार्यकर्ते इतके भावनिक असतात की, नेत्याचे काही चुकल्यास त्यांना बोल लावण्यास कचरत नाहीत. उत्तर प्रदेश येथील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एका कार्यकर्त्याने नेत्याचा सत्कार केला आणि त्यानंतर त्याच नेत्याला एका मागोमाग कानशिलात लगावल्या. मारहाणीचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

प्रकरण काय आहे?

सुहेलदेव स्वाभिमान पक्षाचे (SSP) राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र राजभर एका भूमिपूजनाच्या कामासाठी जलालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशापूर गावी गेले होते. महाराज सुहेलदेव विजय दिनाच्या निमित्ताने गावात पुतळा उभारण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यावेळी ब्रिजेश राजभर नावाच्या कार्यकर्त्याने त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालून नंतर कानशिलात लगावली. ही घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेनंतर महेंद्र राजभर यांनी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांच्यावर आरोप केला आहे. त्यांनीच हा हल्ला घडवून आणला असल्याचे विधान महेंद्र राजभर यांनी केले. दरम्यान प्रकाश राजभर किंवा त्यांच्या पक्षाकडून यावर अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सदर घटनेनंतर महेंद्र राजभर यांनी कार्यक्रम स्थळावरून थेट पोलीस ठाणे गाठले आणि सदर प्रकराची तक्रार दाखल केली. माध्यमांशी बोलताना महेंद्र राजभर म्हणाले की, या कार्यक्रमाच्या चार-पाच दिवसांपूर्वीच ब्रिजेश राजभर हे मंत्री प्रकाश राजभर यांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीनंतर हल्ल्याची योजना आखली गेली असावी.

“ब्रिजेश हा एकेकाळी माझ्या पक्षाचा पदाधिकारी होता. मात्र सध्या त्याला पक्षात कोणतेही पद दिलेले नाही. तो या कार्यक्रमाला कसा आला किंवा कुणी त्याला आमंत्रित केले, याची मला कल्पना नाही. आमच्या पक्षात कोणतेही मतभेद किंवा निधीवरून गोंधळ नाही”, अशी प्रतिक्रिया महेंद्र राजभर यांनी दिली. या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ब्रिजेश राजभरने मला मारहाण केली, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या प्रकारानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवार जोरदार टीका केली. त्यांनी पीडीएचा हवाला दिला. पिछडा, दलित आणि अल्पसंख्याकांना पीडीए अशी संज्ञा देण्यात आली आहे. “पीडीए समुदायावर वाढते हल्ले आणि अत्याचाराची प्रकरणे पाहता भाजपा सरकारची या समुदायाप्रती असलेली असंवेदनशीलता दिसून येते”, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.