दिल्ली सरकारमधील मंत्री परवेश वर्मा यांनी दिल्लीतील एका रस्त्याच्या पाहणीदरम्यान एका तरुणाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परवेश वर्मा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या घटनेनंतर आता मंत्री परवेश वर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“आमच्या मालमत्तेचं कोणी नुकसान करत असेल किंवा आमच्या अधिकाऱ्यांकडे कोणी कमिशनची मागणी करत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आजच्या घटनेमागील हेच सत्य आहे”, असं मंत्री परवेश वर्मा यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.
मंत्री परवेश वर्मा काय म्हणाले?
“विकासपुरी या ठिकाणी मागील काही दिवसांपासून रस्त्याचं काम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराकडून कमिशन मिळवण्यासाठी आमदार जरनैल सिंह हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर दबाव टाकत होते. आमच्या अभियंत्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असून एफआयआर नोंदवला जात आहे. जेव्हा त्यांना कमिशन मिळत नाही, तेव्हा ते रात्री तयार केलेला रस्ता दुसऱ्या दिवशी सकाळी खोदून काढत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे व्हिडिओ प्रसारित करतात”, असा आरोप मंत्री परवेश वर्मा यांनी केला.
“मी आज या कामाची पाहणी केली आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं मला दिसून आलं. स्थानिक रहिवाशांनी मला सांगितलं की या ठिकाणी गेल्या १५ वर्षांत कोणताही रस्ता बांधला गेला नव्हता. मात्र, आता चांगल्या प्रकारचे रस्ते बांधले जात आहेत, त्यामुळे आम आदमी पार्टीला अस्वस्थता वाटली असावी”, अशी टीका परवेश वर्मा यांनी केली.
‘रागाच्या भरात ती प्रतिक्रिया दिली’
“आमदार जरनैल सिंह यांना तीनदा फोन केला आणि ४५ मिनिटे वाट पाहिली. ते आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं आणि माझ्या कुटुंबाबाबत अपशब्द वापरले. त्यामुळे मी रागाच्या भरात ती प्रतिक्रिया दिली”, असं परवेश वर्मा यांनी सांगितलं.
‘आजच्या घटनेमागील हेच सत्य आहे’
“‘आप’चा कोणताही आमदार सरकारी कामात अडथळा आणत असेल, आमच्या मालमत्तेचं नुकसान करत असेल किंवा आमच्या अधिकाऱ्यांकडे कमिशनची मागणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आजच्या घटनेमागील हेच सत्य आहे”, असा आरोप परवेश वर्मा यांनी केला.
नेमकी घटना काय घडली?
दिल्ली सरकारमधील मंत्री परवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीतील तिळक नगर येथील एका रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. रस्त्याच्या पाहणीसाठी गेले असता त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, मंत्री परवेश वर्मा रस्त्याची पाहणी करत असताना एक तरुण त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मात्र, ते पाहून परवेश वर्मा हे व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाचा मोबाईल खाली ओढतात आणि त्याच्या कानशिलात लगावतात. त्यानंतर तो तरुणही परवेश वर्मा यांच्या अंगावर धावून जाताना व्हिडीओत दिसत आहे. यावेळी या दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. मात्र, तेवढ्यात एक सुरक्षा रक्षक दोघांमध्ये येतो आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी गोंधळ झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
परवेश वर्मांच्या अटकेची मागणी
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे आणि मंत्री परवेश वर्मा यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. “रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या एका मंत्र्याने एका तरुणाच्या कानशिलात लगावली. आता मी उद्या (२८ सप्टेंबर) टिळक नगरला जाऊन त्या रस्त्याची पाहणी करणार आहे. मात्र, या परवेश वर्मा यांना अटक झाली पाहिजे”, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
