भारतीय जनता पक्षाचे नेते तथा दिल्ली सरकारमधील मंत्री परवेश वर्मा यांनी रस्त्याच्या पाहणीच्या दौऱ्यादरम्यान एका तरुणाच्या कानशिलात लगावली असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परवेश वर्मा यांच्यावर आणि भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठली आहे.

या घटनेवरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त करत थेट मंत्री परवेश वर्मा यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेवर आता सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या घटनेबाबत अद्याप मंत्री परवेश वर्मा यांची किंवा दिल्ली सरकारमधील कोणाचीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

व्हिडीओत काय दिसत आहे?

दिल्ली सरकारमधील मंत्री परवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीतील टिळक नगर येथील एका रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. रस्त्याच्या पाहणीसाठी गेले असता त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, मंत्री परवेश वर्मा रस्ते पाहणी करत असताना एक तरुण त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मात्र, ते पाहून परवेश वर्मा हे व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाचा मोबाईल खाली ओढतात आणि त्याच्या कानशिलात लगावतात.

त्यानंतर तो तरुणही परवेश वर्मा यांच्या अंगावर धावून जाताना व्हिडीओत दिसत आहे. यावेळी या दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. मात्र, तेवढ्यात एक सुरक्षा रक्षक दोघांमध्ये येतो आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत त्या ठिकाणी असलेली लोकांची गर्दी आणखी वाढते आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

‘परवेश वर्मांना अटक करा’ : अरविंद केजरीवाल

दरम्यान, या घटनेवरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे आणि मंत्री परवेश वर्मा यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या एका मंत्र्याने एका तरुणाच्या कानशिलात लगावली. आता मी उद्या (२८ सप्टेंबर) टिळक नगरला जाऊन त्या रस्त्याची पाहणी करणार आहे. मात्र, या परवेश वर्मा यांना अटक झाली पाहिजे”, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.