कराची : पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या पार्थिवावर मंगळवारी येथील लष्कराच्या जुन्या कब्रस्तानात त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि अनेक विद्यमान व निवृत्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कार विधीत पंतप्रधान शाहबाज शरीफ किंवा पाकिस्तानचे अध्यक्ष सहभागी झाले नाहीत.
मुशर्रफ यांचे पार्थिव पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजात ठेवले होते. परंतु शासकीय इतमाम देण्यात आला नाही. पाकिस्तानची ‘असेंब्ली’ देशातील प्रमुख राजकीय नेत्याच्या मृत्यूनंतर ‘फातिहा’ पठण करण्याची परंपरा पाळते. मात्र, मुशर्रफ यांच्यासाठी तसे करण्यावरून देशाचे वरिष्ठ सभागृहातील सिनेटमध्ये आरोप-प्रत्यारोप व गदारोळ झाला. अखेर सिनेट सदस्य वसीम यांच्या नेतृत्वाखाली ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’च्या (पीटीआय) सदस्यांनी ‘फातिहा’ पठण केले, तर सत्ताधारी पक्षाचे सदस्यांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला. मुशर्रफ यांच्या अंत्यसंस्काराआधीची नमाज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी मालीर कॅन्टोन्मेंट येथील गुलमोहर पोलो मैदानावर अदा करण्यात आली.