Punjab Mansa Facebook Live Shooting : पंजाबमधील मानसा येथे अमली पदार्थांविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची मंगळवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका औषधाच्या दुकानातून कृत्रिम अमली पदार्थ विकले जात असल्याचा आरोप करत झोटा यांनी थेट दुकानमालक अश्वनी कुमार याला जाब विचारला होता. धक्कादायक म्हणजे, या संपूर्ण वादाचे आणि हत्येच्या चित्रीकरण झोटा यांच्या ‘फेसबुक लाइव्ह’मध्ये कैद झाले आहे. या गोळीबारात त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार

हत्या होण्यापूर्वी परविंदर सिंह झोटा फेसबुकवर लाईव्ह करत औषध दुकानमालकाला जाब विचारत होते. दुकानातून बेकायदेशीरपणे कृत्रिम अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप ते करत असताना, व्हिडीओमध्ये दुकानमालक कुमार पिस्तूल दाखवून झोटा यांना धमकावताना स्पष्ट दिसतो. या लाइव्हच्या शेवटी झोटा यांनी कुमारने पाठीमागे शस्त्र लपवल्याचे सांगितले होते. तसेच, नुकतीच एका वृद्ध व्यक्तीने या दुकानातून अमली पदार्थ विकत घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यानंतर अवघ्या काही क्षणांतच झालेल्या वादात गोळीबार झाला.

अमली पदार्थांविरोधात सातत्याने मोहीम

परविंदर सिंह झोटा हे मानसा परिसरात दीर्घकाळापासून अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराविरोधात मोहीम राबवत होते. कथितरीत्या अमली पदार्थ विकणाऱ्यांना ते थेट गाठून जाब विचारत आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करत असत. त्यामुळे अनेकदा त्यांचे अशा लोकांबरोबर कॅमेऱ्यासमोरवाद होत असत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून, मानसा येथील औषध दुकानांमधून होणाऱ्या कथित कृत्रिम अमली पदार्थांच्या विक्रीची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी सीबीआयला पुढे येण्याचे आवाहन केले होते.

संशयित फरार; पोलिसांकडून शोध सुरू

या घटनेनंतर आरोपी अश्वनी कुमार घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून २४ तासांच्या आत त्याला अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

पंजाब सरकारवर विरोधकांची टीका

या हत्येनंतर पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारवर काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भाजपाने टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परगट सिंह यांनी या घटनेला दुर्दैवी ठरवत, अमली पदार्थांविरोधात आवाज उठवणारेच सुरक्षित नसल्याचा आरोप केला. अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत, सरकारची ‘युद्ध नशियां विरुद्ध’ ही मोहीम अपयशी ठरल्याची टीका केली.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही या हत्येचा निषेध केला. अमली पदार्थमुक्त पंजाबचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारच्या काळात अमली पदार्थांविरोधात लढणाऱ्यांनाच धोका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार मलविंदर सिंह कांग यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. पंजाब पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.