सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या डोळय़ांत धूळफेक करून मौल्यवान वस्तूंची तस्करी करण्यासाठी प्रवाशांकडून विविध शक्कल लढवल्या जातात. केरळमधील एक प्रवासी तर चक्क कंडोममधून द्रव स्वरूपात सोने घेऊन दुबईला जाणार होता. मात्र जागरूक सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्याने त्याची ही अनोखी शक्कल अयशस्वी ठरली. मूळचा कासारगॉड येथील असलेला हा प्रवासी एअर इंडियाच्या विमानाने दुबईला चालला होता. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता, या बॅगेत प्लॅस्टिकचे चार डबे होते. या डब्यात असलेल्या कंडोममध्ये द्रव स्वरूपात पदार्थ असल्याचे आढळल्याने सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली. त्या वेळी हा द्रवपदार्थ सोने असल्याची आढळल्याने या प्रवाशाला तात्काळ अटक करण्यात आली. तब्बल पाच किलो ३४५ ग्रॅम वजनाचे हे सोने होते, असे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले.