Passengers Jumped From Plane In Spain Video Goes Viral: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, विमानांच्या लहान-मोठ्या अपघातांबद्दलच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. अशात, आता स्पेनमधील पाल्मा दे मॅलोर्का विमानतळावर रायनएअरच्या बोईंग ७३७ विमानात आगीचा इशारा देण्यात आल्यानंतर किमान १८ प्रवासी जखमी झाले. शनिवारी मँचेस्टरला जाणारे विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच ही घटना घडली.

अरब टाईम्सच्या वृत्तानुसार, आपत्कालीन विभागाला परिस्थितीची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विमानतळावरील अग्निशमन दल आणि सिव्हिल गार्डच्या सदस्यांसह प्रादेशिक आपत्कालीन समन्वय केंद्राने चार रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या होत्या.

घटनेदरम्यान, प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने विमानातून बाहेर काढण्यात आले, तर काही प्रवाशांनी सुरक्षिततेसाठी विमानाच्या पंखावरून थेट जमिनीवर उडी मारली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही प्रवासी घाबरून आपत्कालीन मार्गातून विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत. याचबरोबर, काही प्रवासी आधी विमानाच्या पंखावर चढताना आणि नंतर जमिनीवर उडी मारताना दिसत आहेत.

प्रादेशिक आपत्कालीन समन्वय केंद्राच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अठरा प्रवासी जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेला रायनएअर या विमान कंपनीने दुजोरा दिला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “४ जुलै रोजी पाल्माहून मँचेस्टरला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण, आगीची खोटी सूचना देणारा दिवा चालू झाल्यामुळे थांबवावे लागले. यानंतर विविध उपाययोजना करून प्रवाशांना खाली उतरवून टर्मिनलवर आणण्यात आले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्यात, अमेरिकन एअरलाइन्सच्या एका विमानात अशीच एक घटना घडली होती. त्या विमानाच्या एका इंजिनाला हवेत आग लागली होती. १५३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स असलेल्या या विमानाचे उड्डाणानंतर काही वेळातच लास वेगासमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते.