Passport Rules India : पासपोर्ट हा केवळ परदेश प्रवासासाठी आवश्यक असलेला एक दस्तऐवज (ट्रॅव्हल डॉक्युमेंट) असून तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. हा दस्तऐवज केवळ भारतीय नागरिकांनाच जारी केला जात असला, तरी त्यावरून एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध होत नाही, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले.

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मतदार यादीच्या पुनरिक्षण मोहिमेदरम्यान असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. ‘आधार कार्ड’ हा केवळ ओळखीचा पुरावा असून तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. आता परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टबाबतही अशीच भूमिका मांडली आहे.

ई-पासपोर्ट आणि सुरक्षितता परराष्ट्र मंत्रालयाने नवीन चिप-आधारित ‘ई-पासपोर्ट’बद्दल माहिती दिली. या पासपोर्टमध्ये बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवला जात असल्याने जागतिक स्तरावर त्याला सहज मंजुरी मिळते, तसेच फसवणूक आणि बनावट पासपोर्ट तयार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो, असे मंत्रालयाने सांगितले.

गतिमान आणि सुलभ सेवा भारतात सध्या ५०० हून अधिक ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ कार्यरत आहेत. वर्ष २०२५ मध्ये देशात तब्बल १.५ कोटी पासपोर्ट आणि संबंधित सेवांचे वितरण करण्यात आले आहे. सध्या पोलीस पडताळणीचा काळ वगळता, अवघ्या ६ कार्यालयीन दिवसांत पासपोर्ट तयार होतो. तसेच, पासपोर्ट सेवा केंद्रात नागरिकांना आपले काम पूर्ण करण्यासाठी ४५ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय पासपोर्टचे वाढते महत्त्व भारतीय नागरिकांसाठी आता परदेश प्रवास अधिक सुलभ झाला आहे. २०१९ मध्ये केवळ १६ देशांमध्ये भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश मिळत होता, ती संख्या आता २७ झाली आहे. याशिवाय, ४७ देशांमध्ये भारतीयांना ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ सुविधा उपलब्ध आहे.

६६ देश भारतीयांना ‘इलेक्ट्रॉनिक व्हिसा’ देतात.

युरोपीय देशांसोबत झालेल्या नव्या गतिशीलता करारांमुळे विद्यार्थी, प्राध्यापक, व्यावसायिक आणि पर्यटकांना परदेशात जाणे सोपे झाले आहे. तसेच, बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठीही यामुळे मदत होणार आहे. कायदेशीर मार्गाने परदेशात नोकरी आणि स्थलांतर करू इच्छिणाऱ्या भारतीयांना परदेशी कंपन्यांशी जोडण्यासाठी मंत्रालय लवकरच दोन दिवसीय ‘ह्युमन रिसोर्स मोबिलिटी फोरम’ आयोजित करणार आहे.

१४ वा पासपोर्ट सेवा दिवस

१४ व्या ‘पासपोर्ट सेवा दिवसा’निमित्त परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘X’ (ट्विटर) वर संदेश जारी केला. १९६७ च्या पासपोर्ट कायद्याच्या वर्धापनदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. भारतातील पासपोर्ट प्रणालीच्या आधुनिकतेचा आणि डिजिटल क्रांतीचा हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.