Patanjali Insurance Entry: एफएमसीजी आणि आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने आता विमा क्षेत्रात प्रवेश केला आहे. आयुर्वेदासह रोजच्या वापरातील साबण, टुथपेस्ट, फेसवॉश, तूप, अगरबत्तीपासून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या पतंजलीचे विमा क्षेत्रातील पाऊल मोठा निर्णय मानला जात आहे. ‘आयआरडीएआय’ने कंपनीच्या मॅग्मा जनरल इन्शुरन्सच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. IRDAI ने मंजुरी दिल्यानंतर पतंजलीचा विमा बाजारपेठेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पतंजली आयुर्वेद आणि डीएस ग्रुपकडून अधिग्रहण

पतंजली आयुर्वेद आणि डीएस ग्रुपने सोबतीने केलेल्या या अधिग्रहणाला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. जवळपास ४,५०० कोटी रुपये या अधिग्रहणाचे मूल्य आहे. डीएस ग्रुप खाद्यपदार्थ आणि मिठाई व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. करारानुसार, पतंजली आयुर्वेद मॅग्मा जनरल इन्शुरन्समध्ये ७३.५६ टक्के हिस्सा विकत घेईल, तर डीएस ग्रुपकडे २४.५ टक्के मालकी असेल. यामुळे सनोटी प्रॉपर्टीज एलएलपीच्या भागधारकांकडून पतंजली आणि डीएस ग्रुपकडे ९८ टक्के हिस्सा येईल. दरम्यान, सनोटी प्रॉपर्टीज आदर पूनावाला ग्रुपचाच भाग आहे.

IRDAI कडून मिळाली मंजुरी

आयआरडीएआयकडून मिळालेली मंजुरी तीन महिन्यांसाठी वैध राहणार आहे. या कालावधीत कंपनीकडून व्यवहार पूर्ण होणे अपेक्षित आहे. वित्त क्षेत्रात पंतजलीकडून पहिल्यांदाच प्रवेश करण्यात आला आहे. दरम्यान, पतंजली आयुर्वेदने यापूर्वी एफएमसीजी आणि आयुर्वेद क्षेत्रात मोठी प्रसिद्ध मिळवली आहे. विमा क्षेत्रात नव्या कंपनीची सुरुवात करण्यापेक्षा पतंजलीने यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या कंपनीचे अधिग्रहण करण्यास पसंती दिली. मॅग्मा जनरल इन्शुरन्स कंपनी वाहन, आरोग्य, मालमत्ता आणि व्यावसायिक विमा क्षेत्रात कार्यरत आहे.

नेटवर्कचा फायदा होण्याची शक्यता

पतंजली अस्तित्वात असलेल्या नेटवर्कचा विमा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी वापर करेल, असे मत विमा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पतंजली आयुर्वेदचे ग्रामीण, निम शहरी भागात भक्कम जाळे आहे. मॅग्मा जनरल इन्शुरन्सकडे हजारो एजंट असून, विमा ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे. करारानुसार सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर लवकरच बाजारात पंतजली विमा क्षेत्रात नवी कंपनी म्हणून उदयास येईल.