पठाणकोट दहशतवादी हल्ला
पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांचे पत्ते असलेली विनंतीपत्रे भारताने तयार केली असून ती पाकिस्तानला पाठविण्यात येणार आहेत.
भारताच्या तपास पथकाला पाकिस्तानात तपास करण्याबाबत पाकिस्तानकडून अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ही विनंतीपत्रे पाठविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ठार झालेल्या चार दहशतवाद्यांची छायाचित्रे आपल्या अधिकृत संकेतस्थळावर टाकली असून, त्यांना ओळखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन सर्वसामान्य जनतेला केले आहे.
एनआयएकडे त्यासंदर्भात ई-मेलद्वारे खूप पत्रे आली असून, त्यापैकी काही पत्रे पाकिस्तानातूनही आली आहेत आणि त्यामध्ये दहशतवाद्यांबाबतची माहिती आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा या दहशतवाद्यांच्या घरांचे पत्ते आणि अन्य सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र भारताच्या या विनंतीवजा मागणीला पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पाकिस्तानच्या पथकाने हवाई दलाच्या तळाला भेट देऊन १६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले होते.