पतियाळा : पंजाबमधील पतियाळा येथे शुक्रवारी झालेल्या चकमकींच्या संबंधात प्रमुख आरोपी बरजिंदर सिंग परवाना याच्यासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या चकमकींत चौघे जखमी झाले होते.

खलिस्तानविरोधी मोर्चाच्या मुद्दय़ावरून शुक्रवारी दोन गटांमध्ये संघर्ष होऊन त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली होती, तसेच तलवारी हवेत परजल्या होत्या.  परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करणे भाग पडले होते.

या प्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आल्यामुळे, आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे.

मुख्य आरोपी बरजिंदर सिंग परवाना याला मोहाली येथून अटक करण्यात आल्याचे पतियाळा परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मुखिवदर सिंग छिना यांनी सांगितले. ३८ वर्षांचा परवाना याला न्यायालयाने  चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या मते, जिल्ह्यातील राजपुरा येथील रहिवासी असलेला परवाना हा शुक्रवारच्या घटनेमागील सूत्रधार आहे. कालिमाता मंदिराकडे जाण्यास त्याने शीख कट्टरवाद्यांना फूस लावली.  परवाना ऊर्फ सनी याच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. पदवीधर असलेला परवाना समाजमाध्यमांवर प्रक्षोभक भाषणे करण्यासाठी ओळखला जातो. २००७-०८ साली तो सिंगापूरला गेला व तेथे १८ महिने राहून परत आला.

राजपुरा येथे त्याने ‘दमदमी टकसाल’ ही स्वत:ची शीख धार्मिक शाळा सुरू केली. तीन शेती कायद्यांविरुद्धच्या शेतकरी आंदोलनातही तो सहभागी झाला होता.