टी-२० विश्वचषकामध्ये भारताच्या पराभवानंतर आणि पाकिस्तानच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्या आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या तीन काश्मीरी विद्यार्थ्यांच्या सुटकेवरुन राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहिलं आहे. मोदींनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करत तातडीने या मुलांना सोडून देण्यात यावं असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी म्हणजेच पीडीपीच्या नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानच्या विजयानंतर आनंद साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईबद्दल बोलताना मुक्ती यांनी काश्मीरमध्ये देशभक्त सरकार बनवण्यासाठी काश्मीरी लोकांचं मन आणि विचारशक्तीला प्रभावित करुन त्यांना जिंकणं महत्वाचं आहे. मात्र सरकार हे करताना दिसत नाहीय. इतर देशाच्या संघाला समर्थन देणं हा देशद्रोह नसल्याचंही मुफ्ती यांनी पत्रात म्हटलं आहे. विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करता पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी मुफ्ती यांनी केलीय.

एखाद्या देशाबद्दल इमानदार राहण्याची भावना आणि देशभक्ती ही एखाद्यामध्ये आपुलकीने निर्माण करावी लागते. “देशभक्तीची भावना ही सक्तीने किंवा बंदूकीचा धाक दाखवून निर्माण करता येत नाही,” असा उल्लेखही मुफ्ती यांनी पत्रात केला आहे. हा सामना केवळ मनोरंजन म्हणून होता. त्यानंतर आग्रा येथील तीन काश्मीरी विद्यार्थ्यांना करण्यात आलेली अटक चुकीची असल्याचं मुफ्ती म्हणाल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या कॉलेजनेही हे विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या देशद्रोह ठरेल अशा कृतीमध्ये नाहीत असं सांगितल्यानंतरही या मुलांना कैदेत ठेवणं चुकीचं असल्याचं मत मुफ्ती यांनी व्यक्त केलंय. विद्यार्थ्यांना अशी वागणूक दिली तर देशभरातील तरुणाईमध्ये चुकीचा समज निर्माण होईल अशी भीतीही मुफ्ती यांनी व्यक्त केलीय.

या विद्यार्थ्यांना झालेल्या अटकेबद्दल बोलताना मुफ्ती यांनी आमच्या पक्षाला या निर्णयाविरोधात काश्मीरमध्ये मोर्चा काढायचा होता. मात्र आम्हाला मोर्चा काढून विरोध करण्याची परवानगीही देण्यात आली नाही, अशी खंत मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वीही मुफ्ती यांनी या प्रकरणावर भाष्य करताना भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून शिकावं असा सल्ला दिला होता. मेहबुबा मुफ्ती यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. “पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींवर एवढा राग का? देश के गद्दार को, गोली मारो… अशा घोषणाही काही लोक देत आहेत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर किती लोकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला, हे कोणीही विसरू शकत नाही. हे विराट कोहलीसारखे योग्य भावनेने घ्या, ज्याने सर्वप्रथम पाकिस्तानी संघाचे अभिनंदन केले,” असे मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी या ट्विटसोबत विराट कोहलीचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पाकिस्तानी फलंदाज रिझवानशी बोलताना दिसत आहे.

रविवारी दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी २० विश्वचषक सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. २००७ ते २०१६ या काळात भारत विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडून कधीही हरलेला नाही. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने प्रथमच भारतावर विजय मिळवला आहे.