Pawan Kalyan Reaction on Vijay win in Tamil Nadu Election: तमिळनाडूच्या राजकारणात विजय आणि त्याच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाची सध्या देशभरात चर्चा आहे. या ऐतिहासिक यशावर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विजयचा हा झंझावाती विजय पाहून मला त्याचा थोडा हेवाच वाटला,” अशा शब्दांत पवन कल्याण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अर्थात, त्यांनी ही प्रतिक्रिया अत्यंत हलक्या-फुलक्या आणि विनोदी शैलीत दिली.
“आम्ही १५ वर्षे रस्त्यावर संघर्ष केला, पण त्यांनी…”
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पवन कल्याण यांनी तमिळनाडूच्या बदलत्या राजकारणावर भाष्य केले. ते म्हणाले, “आजकाल तमिळनाडूचे राजकारण पाहिले की वाटते, त्यांनी किती सहजपणे हे करून दाखवले. मला तर त्यांचा हेवा वाटतोय. कटआऊट्स आणि होलोग्रामच्या जोरावर त्यांनी अगदी आनंदात निवडणूक जिंकली. दुसरीकडे, मी मात्र तब्बल १५ वर्षे रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय… (हसत). अर्थात, मी हे गमतीने म्हणत आहे.”
पवन कल्याण पुढे म्हणाले की, “यामागील मानवी दृष्टिकोनही आपण समजून घेतला पाहिजे. कोणतीही गोष्ट बोलण्यासाठी किंवा करण्यासाठी प्रचंड अभ्यासाची गरज असते. मी १५ वर्षे एवढा संघर्ष का केला? कारण, एखादा राजकीय पक्ष चालवायचा असेल, तर लाखो लोकांच्या अपेक्षा काय आहेत, हे तुम्हाला सखोलपणे समजून घ्यावे लागते. विजयच्या या यशामधून जनतेला बदल हवा आहे, हेच दिसून येते.”
चिरंजीवींचा मुख्यमंत्री विजयला फोन; एमजीआर यांच्याशी केली तुलना
दुसरीकडे, पवन कल्याण यांचे मोठे बंधू आणि चिरंजीवी यांनी तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय यांचे फोनवरून विशेष अभिनंदन केले आहे. चिरंजीवी यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याची चर्चा झाली.
चिरंजीवी यांनी विजयला मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आणि “जनतेच्या हिताचे शासन करून लोकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करा,” अशी आशा व्यक्त केली. तामिळनाडूचे दिवंगत लोकप्रिय नेते एम. जी. रामचंद्रन (MGR) यांच्याप्रमाणेच विजयलाही जनतेचे अफाट प्रेम लाभेल, असा विश्वास चिरंजीवी यांनी या वेळी व्यक्त केला.
या संभाषणादरम्यान विजयने ‘जन नायकन’ चित्रपटाच्या पायरसी वादाच्या वेळी चिरंजीवी यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच चिरंजीवी यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘माना शंकर वर प्रसाद गारू’ हा चित्रपट पाहिल्याचे सांगत स्क्रीनवर त्यांना पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता, अशी भावना विजयने व्यक्त केली.
दशकांचे राजकारण मोडीत काढत विजयचा नवा इतिहास
विजयने निवडणुकीच्या अवघ्या दोन वर्षांपूर्वी ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाची स्थापना केली होती. पहिल्याच निवडणुकीत त्याने तमिळनाडूच्या राजकारणावर अनेक दशकांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) सारख्या मातब्बर पक्षांना धूळ चारत सत्ता काबीज केली. या ऐतिहासिक विजयानंतर विजयची तुलना आता एन. टी. रामाराव (NTR), एम. जी. रामचंद्रन (MGR) आणि जे. जयललिता यांच्यासारख्या रुपेरी पडद्यावरून राजकारणाचे क्षितिज काबीज करणाऱ्या दिग्गज नेत्यांशी केली जात आहे.
सिने जगतातूनही मुख्यमंत्री विजय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकतीच प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी ‘स्मॉल स्क्रीन प्रोड्युसर्स कौन्सिल’च्या अध्यक्षा म्हणून सचिवालय गाठून मुख्यमंत्री विजय यांची भेट घेतली. या भेटीनंतर खुशबू भावुक झाल्या आणि त्यांनी ट्विटरवर लिहिले, “विजयला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेले पाहून मी खूप भावुक झाले. आमची भेट अत्यंत आदरयुक्त आणि आपुलकीची ठरली.”
