नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अवमानजनक विधान केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना आसामच्या पोलिसांनी गुरुवारी दिल्ली विमानतळावर अटक केली. त्यांना विमानातून खाली उतरविण्यात आल्यानंतर विमानासमोरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. नाटय़मय घडामोडींनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आधारे येथील द्वारका न्यायालयाने खेरा यांची अंतरिम जामिनावर सुटका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एका पत्रकार परिषदेमध्ये कथित अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी खेरा यांच्याविरोधात आसाम आणि उत्तर प्रदेशात मिळून तीन गुन्हे दाखल झाले आहेत. गुरूवारी सकाळी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी खेरा अन्य नेत्यांसह रायपूरला जाण्यासाठी विमानामध्ये बसले. त्यांच्या केवळ हँडबँग असतानाही सामानाची समस्या असल्याचे कारण देत त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आले आणि आसाम पोलिसांनी अटक केली. खेरांसोबत असलेले ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला यांनी पोलिसांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिल्ली विमानतळावर प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांसह विमानाशेजारी ठिय्या आंदोलन सुरू केले. ‘मोदी जेव्हा घाबरतात तेव्हा पोलिसांना पुढे करतात’, अशा जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. दुसरीकडे अटकेविरोधात काँग्रेसने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. विमानतळावरील गदोराळाची चित्रफीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंहा व न्या. एम. आर. शहा यांच्या तीन सदस्यांच्या पीठासमोर दाखविण्यात आली. आसाम पोलिसांच्या कारवाईमुळे विमानतळावर निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाला दिली. खेरा यांनी अजाणतेपणी चुकी केली असून त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचेही सिंघवी यांनी सांगितले. आसाम पोलिसांनी अचानक केलेल्या कृतीची सर्वोच्च न्यायालयाने दखत घेत, तुम्हाला तूर्त संरक्षण देत आहोत, असे स्पष्ट करत खेरांना अंतरिम जामीन देण्याचा आदेश दिला. खेरा यांच्याविरोधात आसाम तसेच, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ व वाराणसीत दाखल झालेले सर्व गुन्हे एकत्र करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Parambans Singh Romana on Narendra Modi
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

मोदींबद्दल टिप्पणी केली म्हणून भारतीय दंडविधानाअंतर्गत १२०, १५३ अ, १५३ ब-१, ५०० अशा गंभीर कलमांखाली कारवाई का केली जात आहे, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. गुन्हा दाखल केल्याची वा अटकेच्या आदेशाची प्रत न दाखवताच पोलिस दिल्ली विमानतळावर खेरांना अटक करण्यासाठी आले होते, असे सुरजेवाला यांचे म्हणणे होते. अखेर विमानतळाच्या लॉन्जमध्ये दोन तासांनंतर खेरांना अटक करण्यात आली. त्यानंतर आसामला घेऊन जाण्याच्या परवानगीसाठी (ट्रान्झिट रिमांड) पोलिसांनी खेरा यांना द्वारका न्यायालयात दाखल केले. या प्रकरणी द्वारका न्यायालयात २८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. अटक कशासाठी केली हे माहिती नाही. पण, (भाजपविरोधात) मोठी लढाई लढावी लागेल, मी ती लढेन, असे पवन खेरा म्हणाले. असा कोणता गुन्हा केला म्हणून खेरांना अटक केली जात आहे? नेहरूंचे आडनाव का वापरत नाही, असा असभ्य प्रश्न मोदींनी विचारला होता. मोदींनी अनेकवेळा काँग्रेसच्या नेत्यांविरोधात असभ्य टिप्पणी केली आहे. तुम्ही असभ्य बोलून भारतीय संस्कृतीचा अवमान करणार आणि अटक मात्र काँग्रेसच्या नेत्याला करणार? असा संतप्त सवाल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला.

आरोप काय?
अदानीप्रकरणी हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेच्या अहवालावर केंद्र सरकारविरोधात देशभर ठिकठिकाणी काँग्रेसने पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. या वेळी खेरा यांनी मोदींचा उल्लेख नरेंद्र गौतमदास मोदी असा केला होता. खेरा यांनी मोदींबद्दल अवमानजनक शब्द उच्चारल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ता सॅम्युअल चँगसंग याने गुन्हा दाखल केला. खेरांविरोधात आसामधील दिमा हसाओ येथे धार्मिक सलोख्याचा भंग केल्याचा तसेच, बदनामीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आमचे प्रवक्ते खेरा यांना बळजबरीने विमानातून उतरवून अटक करण्यात आली. मोदी सरकारने भारताची लोकशाही ‘हिटलरशाही’च्या पातळीवर आणून ठेवली आहे. आम्ही या हुकुमशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करतो. – मल्लिकार्जून खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

ही कारवाई कायद्यानुसार झाली आहे. आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत, या गैरसमजात काँग्रेस नेत्यांनी राहू नये. दिल्ली विमानतळावर आंदोलन करून काँग्रेसने अन्य प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला. निदर्शनांमुळे सामान्यांना त्रास झाला. – गौरव भाटिया, भाजप प्रवक्ते

(‘विमान’रोको आंदोलन : पवन खेरा यांना विमानातून खाली उतरवून अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विमानाजवळ बसून ठिय्या दिला.)