Pawan Khera Criticizes Ravi Shastri: काँग्रेस नेते पवन खेरा यांनी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिक्स परिषदेतील भूमिकेचे कौतुक करणाऱ्या शास्त्री यांच्या पोस्टवर टीका करताना खेरा यांनी २०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या परिषदेची आठवण करून दिली.
रवी शास्त्री यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते, भारतीय असल्याचा इतका अभिमान कधीही वाटला नव्हता, असे रवी शास्त्रींनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
“राष्ट्रपती पुतीन, राष्ट्रपती क्षी जिनपिंग आणि आमचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत मातेच्या भूमीवर एकत्र आले. अशी आंतरराष्ट्रीय राजनैतिक रणनीती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. अभिमानास्पद! मोदीजी,” असे क्रिकेटपटू आणि समालोचक असलेल्या शास्त्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
शास्त्री यांनी भारताच्या मंडपम् येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान मोदी, पुतीन आणि क्षी जिनपिंग यांनी लावलेल्या रोपट्यांना पाणी घालतानाचा एक फोटोही शास्त्रींंनी पोस्टबरोबर शेअर केला होता.
यावर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी टीका केली. २०१२ मध्ये भारताने या परिषदेचे यजमानपद भूषवले होते, तेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दोन्ही बाजूंना दोन महासत्तांचे सर्वोच्च नेते उपस्थित होते, हे एका माजी क्रिकेटपटूने लक्षात ठेवणे मोठे ठरेल असे खेरा म्हणाले.

“२९ मार्च २०१२ रोजी नवी दिल्ली येथे डॉ. मनमोहन सिंग यांच्या बाजूला हू जिताओ आणि दिमित्री मेदवेदेव उपस्थित होते, हे रवी शास्त्रींनी लक्षात ठेवणे ही अपेक्षा फार मोठी ठरेल. तसेही, हे संदेश पीएमओमधील कोण व्यक्ती लिहून देते, हे आम्हाला माहीत आहे,” असे म्हणत काँग्रेस नेत्याने २०१२ मधील त्या नेत्यांचा एक फोटोही शेअर केला.
या वादात भर घालत भारतीय युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही शास्त्री यांच्या क्रिकेट पार्श्वभूमीवर उपरोधिक टोमणा मारला. “रवी भाई, ही काही आयपीएलचे समालोचन नाहीये. प्रत्येक माहिती असलेल्या फटक्याला तुम्ही ‘यापूर्वी कधीही न पाहिलेला’ असे म्हणू शकत नाही. तुमचा सध्याचा स्पॉन्सर येण्यापूर्वी भारत आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राजनैतिक घडामोडींमध्ये सक्रिय होता,” अशी टीका श्रीनिवास यांनी केली.
