नवी दिल्ली : देशात भाजपविरोधात वेगवेगळय़ा पक्षांचे नेते एकजुटीचे प्रयत्न करीत असतानाच, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही, येथे पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात विरोधकांच्या ऐक्याचे रणिशग फुंकले! भाजपच्या धर्माध राजकारणावरही पवारांनी घणाघाती टीका केली. ‘पक्षाच्या नेत्यांनी, विविध स्तरावरील पक्षप्रमुखांनी आगामी काळात कोणती राजकीय धोरणे राबवली पाहिजेत यावर चर्चा केली पाहिजे. भाजपविरोधात समविचारी पक्षांशी त्यांनी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. या पक्षांशी संपर्क साधून विरोधकांच्या एकजुटीसाठी एकत्रितपणे कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत’, अशी सूचना पवार यांनी तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या पक्षाच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात केली.

 नितीशकुमार, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी आदी भाजपविरोधी नेत्यांशी पवार यांच्या सातत्याने चर्चा होत असून विरोधकांच्या ऐक्याच्या वाटचालीमध्ये पवार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, त्यांनी पंतप्रधान पदाची शक्यता आत्ता तरी फेटाळून लावली आहे. अधिवेशनात मात्र पक्षाच्या तमाम नेत्यांनी, ‘पवार आगामी लोकसभा निवडणुकीत अग्रणी भूमिका बजावू शकतात व दिल्लीच्या तख्तावर मराठी नेता विराजमान होऊ शकतो’, अशा सूरात पवारांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीची आशा व्यक्त केली.

पवारांनी मात्र भाजपच्या धोरणांवर टीका केली. ‘देशाची सत्ता हाती घेतल्यानंतर संविधानाची शपथ घेणारे जाती-धर्माच्या आधारावर, मंदिर-मशिदीचा मुद्दा हाती घेऊन समाजात दुफळी माजवत आहेत. अल्पसंख्य समाजाच्या मनात भीती निर्माण करत आहेत’, असा आरोप करून पवार यांनी, ‘भाजपच्या धर्माध राजकारणाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची व गरज पडल्यास बलिदान देण्याची तयारी ठेवा’, असे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केला.

‘देशाने ७५ वर्षांत अनेक चढउतार पाहिले, शेजारी राष्ट्रांमध्ये हुकुमशाही सत्ताधारी पाहिले. भारत कधी या मार्गाने गेला नाही. महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद आदींच्या विचारांमुळे लोकशाही टिकून राहिली. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे लोकशाही परंपरा विकसित झाली’, असे सांगत अप्रत्यक्षपणे पवारांनी भाजपला टोला लगावला.

मोदींकडून दिशाभूलच

लडाखमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनमध्ये सध्या द्विस्तरीय चर्चा होत असली तरी, एप्रिल २०२० मध्ये भारताच्या भूभागात चिनी घुसखोरी झाली नसल्याचा चुकीचा दावा करून पंतप्रधान मोदींनी देशाची दिशाभूल केल्याची घणाघाती टीकाही पवारांनी केली. लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर २ एप्रिल २०२० रोजी दोन्ही देशांच्या गस्त पथकांमध्ये धुमष्चक्री झाली. त्याआधी देपसांग मैदान आणि देमचुक भूभागावरील भारतीय सैनिक गस्त घालत असत, हा भाग चीनने बळकावला असून त्याचा ताबा सोडण्यास अजूनही चीन तयार नाही. एप्रिल २०२० पूर्वी ताब्यात असलेला भूभाग भारताला पुन्हा मिळवता आलेला नाही असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे! चीनच्या आक्रमकतेमुळे अमेरिकेसारख्या देशांनी भारताच्या सीमेवर नेमके काय चालले आहे, अशी विचारणा करून केंद्र सरकारला यासंदर्भात आवश्यक पावले उचलण्याची सूचना केली होती. इतके असून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०२० मध्ये चिनी घुसखोरी झाल्याचा मुद्दाच फेटाळून लावला. पंतप्रधानांनी देशापासून सत्य लपवून ठेवले. चीनने भारताच्या भूभागामध्ये अख्खे गाव बसवले असल्याचे उपग्रह छायाचित्रांतून उघड झाले होते, ही वस्तुस्थितीही केंद्र सरकारने नाकारली, अशी टीका पवार यांनी केली.

अजितदादा गेले कुठे? 

खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करताच टाळय़ांच्या कडकडाटात अजितदादांना प्रतिसाद मिळाला. राज्याच्या अर्थकारणाचे उत्तम नियोजन केल्याबद्द्ल महालेखापरीक्षकांच्या अहवालात अजितदादांचे कौतुक केल्याचे सुळे म्हणाल्या. सुळेंच्या भाषणानंतर खासदार अमोल कोल्हे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण झाले. तोपर्यंत ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या नावाच्या घोषणा दिल्या, त्यांना भाषण करण्याचा आग्रह धरला. जयंत पाटील यांच्या भाषणानंतर प्रफुल पटेल यांनी, ‘खास आग्रहास्तव अजित पवार भाषण करतील’, अशी घोषणा केली. पण, तोपर्यंत अजितदादा गायब झाले होते. ‘आलोच’, असे सांगून ते व्यासपीठावरून खाली उतरले. अजितदादांची वाट पाहून अखेर शरद पवार यांनी समारोपाचे भाषण केले.

दिल्लीच्या तख्ताला आव्हान?

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन काम केले पाहिजे. दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याचा स्वाभिमान आपण शिवाजी महाराजांकडून शिकलो. सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर ठिय्या दिला होता. त्यांनी दिल्लीचे तख्त ताब्यात घेतले नाही, पुढे पानिपतात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीराव पेशव्यांनीही दिल्लीच्या तख्ताला आव्हान दिले होते. या ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन होत असल्याचे सांगत पवारांनी दिल्लीच्या तख्ताला आव्हान देत असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचित केले.