ई वॉलेट कंपनी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तरुणीच्या चौकशीतून नवा खुलासा झाला आहे. आरोपी सोनिया धवनला पोलिसांनी अटक केली असून सोनिया कंपनीची उपाध्यक्ष आहे. सोनियाने घर खरेदी करण्यासाठी चार कोटींची मदत करण्याची विनंती केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने सोनियाने पती आणि एका कर्मचाऱ्याच्या मदतीने विजय शेखर यांच्याविरोधात कट रचल्याचे उघड झाले आहे.

पेटीएमचे विजय शर्मा यांना ब्लॅकमेल करुन २० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी सोनिया धवन, तिचा पती रुपक जैन आणि कंपनीतील कर्मचारी देवेंद्र कुमार या तिघांना अटक केली. सोनिया ही विजय शर्मा यांची सेक्रेटरी म्हणून कंपनीत रूजू झाली होती. यानंतर कामगिरीच्या आधारे ती कंपनीच्या उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचली. सोनिया कंपनीच्या पीआर आणि कम्यूनिकेशन्स विभागाची उपाध्यक्ष होती. दोन महिन्यांपूर्वी तिने विजय शर्मा यांना घर खरेदी करण्यासाठी ४ कोटींची आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. मात्र, विजय यांनी तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे सोनिया चिडली होती. यातूनच तिने विजय यांना ब्लॅकमेल करण्याचा कट रचला, अशी माहिती प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधीक्षक अजय पाल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

सोनिया आणि रुपकने निर्दोष असल्याचा दावा केला असला तरी देवेंद्र कुमारने गुन्ह्याची कबुली दिली. मी त्या दोघांसाठी डेटा चोरला, असे त्याने पोलिसांना सांगितले. कंपनीने इतक्या कर्मी वर्षात कशी प्रगती केली याची माहिती सोनियाकडे होती. तिने गोपनीय माहिती मिळवून त्या आधारे विजय यांना ब्लॅकमेल करण्याचा कट रचला. सोनियाला पेटीएमसारखीच स्वत:ची कंपनी सुरु करायची होती, असेही तपासातून समोर आले आहे. या तिघांनी देवेंद्रचा मित्र रोहित चोमाल याला खंडणीसाठी फोन करायला सांगितले होते. पोलीस आता रोहितचा शोध घेत आहेत.

विजय आणि त्यांचे बंधू अजय यांना खंडणीसाठी फोन आणि मेसेज करण्यात आले होते. अजय यांनी व्हॉट्स अॅपवरील चॅट आणि फोन रेकॉर्डिंग दिले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले.