पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्याला श्रीनगरमधील घरी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण येथे प्रवास करण्यापासून आपल्याला रोखण्यात आलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून बारामुल्ला जिल्ह्यात सभेला संबोधित करणार आहेत. पट्टण येथे ही सभा होणार आहे. याआधी श्रीनगरमध्ये त्यांनी बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Jammu Kashmir: लष्कराने तीन दिवसात घेतला बदला, अधिकाऱ्याच्या हत्येत सहभागी दहशतवाद्यांना केलं ठार, चकमक अद्यापही सुरु

मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या घराच्या गेटचा फोटो ट्वीट करत नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनीही तात्काळ उत्तर देत त्यांच्यावर कोणतंही बंधन नसून, त्या हवं तिथे फिरु शकतात असं स्पष्ट केलं. जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या ट्वीटनंतर मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांचा दावा फेटाळला असून, ते खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.

मेहबुबा मुफ्तींचं ट्वीट काय?

“गृहमंत्री जम्मू काश्मीरमध्ये सर्व काही सामान्य झालं असल्याचं ढोल बडवून सांगत आहेत. पण मला घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. एका कार्यकर्त्याच्या लग्नासाठी मला पट्टणला जायचं होतं. जर एका माजी मुख्यमंत्र्यांचे मुलभूत अधिकार अशाप्रकारे काढून घेतले जात असतील, तर सर्वसामान्याचं काय होत असेल याचा विचार आपण करु शकतो,” असं मुफ्ती मोहम्मद यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी श्रीनगर आणि बारामुल्लादरम्यान ५० किमी हायवेवर निर्बंध लावले आहेत. वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

पोलिसांना फेटाळला दावा

पोलिसांनी मेहबुबा मुफ्ती यांचा दावा फेटाळत त्यांनीच आपला गेट बंद केला असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यावर कोणतेही बंधन नसल्याचा दावा पोलिसांनी केला असून, सोबत गेटचा फोटोही शेअर केला आहे.

मेहबुबा मुफ्तींचं प्रत्युत्तर

मेहबुबा मुफ्ती यांनी पोलिसांचे हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की “मला रात्री पोलीस महासंचालकांनी पट्टणला तुम्ही प्रवास करु शकत नाही असं सांगितलं. आज जम्मू काश्मीर पोलिसांनी स्वत:हून माझ्या घराचा गेट आतून बंद केला आणि उघडपणे खोटं बोलत आहेत. यंत्रणाच अशाप्रकारे वागत आहेत याचं वाईट वाटतं”.

अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून राजौरी जिल्ह्यात त्यांनी एका सभेला संबोधित केलं. अमित शाह यांनी दहशतवाद्यांशी लढताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली. बुधवारी ते बारामुल्ला येथे एका सभेला संबोधित करणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pdp chief mehbooba mufti targets central home minister bjp amit shah over jammu kashmir visit sgy
First published on: 05-10-2022 at 12:54 IST