जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यापासून या राज्याच्या विकासाचा मुद्दा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्वपक्षीय नेतेमंडळींना दिल्लीत बैठकीसाठी पाचारण करून काश्मीरमध्ये विकासाभिमुख धोरण कसं राबवता येईल, याची चर्चा केली. मात्र, या चर्चेतून स्थानिक पक्षांचं समाधान झाल्याचं दिसत नाही. बैठकीनंतर लगेचच मेहबूबा मुफ्ती यांनी केलेली ३७० ची मागणी हे याचंच द्योतक ठरलं. आता पुन्हा एकदा मेहबूबा मुफ्ती यांनी आपली भूमिका मांडली असून यावेळी त्यांनी थेट देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत केंद्रातील विद्यमान मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य केलं. “दिल्लीत जे बसले आहेत, ते जम्मू-काश्मीरचा एक प्रयोगशाळा म्हणून वापर करत आहेत. त्यांचे इथे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. नेहरू, वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांकडे जम्मू-काश्मीरसाठी एक धोरण होतं, पण हे सरकार (मोदी सरकार) हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडत आहे. सरदार आता खलिस्तानी झाले आहेत, आम्ही पाकिस्तानी झालो आहोत आणि फक्त भाजपाच हिंदुस्तानी आहे”, असं मुफ्ती यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, यावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी पुनर्रचनेच्या प्रक्रियेवरून देखील टीका केली. “हा सगळा प्रकार घाईघाईने केला जात आहे. ते फक्त शाळांना शहीदांची नावं देऊन नावं बदलत आहेत. पण फक्त नावं बदलून मुलांना रोजगार मिळणार नाही केंद्र सरकार तालिबानविषयी बोलतं, अफगाणिस्तानविषयी बोलतं, पण ते शेतकरी किंवा बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलत नाही”, असं मुफ्ती म्हणाल्या आहेत.