पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे राजकारणी, मंत्री, मीडियातील नागरीकांचे फोन हॅकिंग प्रकरण केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही जोर पकडू लागले आहे. फ्रान्स सरकारनेही मीडिया कर्मचार्‍यांच्या हेरगिरीच्या आरोपाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंच अन्वेषक १० वेगवेगळ्या आरोपावरून ही चौकशी करणार आहे. पेगॅससद्वारे गोपनीयतेचा भंग झाला आहे का?, हे यातून शोधण्यात येईल. मोरक्कोच्या गुप्तचर संस्थेने पेगॅससच्या माध्यमातून फ्रेंच पत्रकारांवर हेरगिरी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील तक्रारदारांनी मंगळवारी सांगितले की, मोरक्कोच्या गुप्तचर यंत्रणेविरूद्ध केलेल्या आरोपांची चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये इस्त्रायली सुरक्षा गट एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरमार्फत पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. लोकांची गोपनीयता, वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये फसवणूकीने प्रवेश केला गेला आणि त्यामागे गुन्हेगारीची जोड आहे की नाही हे तपासकर्त्यांना समजेल.

हेही वाचा- Pegasus Snoopgate: संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करा; नेत्यांवर पाळत ठेवल्याप्रकरणी शिवसेनेची मागणी

भारतात देखील राजकीय वातावरण चांगलंच तापलं

‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने भारतात देखील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे.