हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे आणि इतिहासाची विकृत मांडणी केल्याचा आरोप झालेले ‘द हिंदूज् : अॅन अल्टरनेटिव्ह हिस्टरी फ्रॉम भारत’ हे पुस्तक नष्ट करण्याचा निर्णय पेंग्विन प्रकाशनने घेतला आहे. दिल्लीस्थित एका स्वयंसेवी संघटनेसह न्यायालयीन प्रक्रियेद्वारे झालेल्या तडजोडीच्या करारान्वये प्रकाशनाने हा निर्णय घेतला आहे.
या पुस्तकात वस्तुस्थितीजन्य इतिहास असल्याचा दावा प्रकाशनसंस्थेने प्रथम केला होता. मात्र या पुस्तकात हिंदू संस्कृतीविषयी तसेच हिंदुत्वाविषयी अनेक संकल्पना पूर्वग्रहदूषित पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. तसेच त्यातील अनेक तपशिलांमध्येही चुका आहेत आणि या पुस्तकाचे लेखन करण्यामागे हिंदू धर्मीय मुलांच्या मनात स्वधर्माविषयी घृणा निर्माण करणे हाच हेतू असावा की काय अशी शंका यावी, इतपत हे लिखाण द्वेषमूलक आहे, असा आक्षेप दिल्लीस्थित शिक्षा बचाव आंदोलन समितीने घेतला होता आणि २०११ मध्येच हे पुस्तक मागे घ्यावे, या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती.
अखेर ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन मध्यस्थीने पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विन आणि समिती यांच्यात एक सामंजस्य करार झाला. या करारान्वये, वेंडी डॉनिगर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या सर्व प्रती बाजारातून मागे घेऊन त्या नष्ट करण्याची तयारी पेंग्विन प्रकाशनाने दाखविली. तसेच यापुढे हे पुस्तक प्रकाशित न करण्याची तसेच विक्रीसाठी उपलब्ध होऊ न देण्याची हमीही प्रकाशनाने दिली.

वेंडी डॉनिंजर आणि भारत
वेंडी या भारतीय इतिहासाच्या सखोल अभ्यासासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या ८०० पानी पुस्तकाच्या संक्षिप्त परिचयात म्हटल्याप्रमाणे, ‘हे पुस्तक म्हणजे जगातील अतिप्राचीन अशा एका धर्माचा इतिहास आणि त्यातील मिथके यांचे कथन आहे.’ जगातील पुरातत्त्व अभ्यासकांमध्ये मानाचे स्थान असलेल्या वेंडी यांनी इतिहासातील घटनांपेक्षा मिथकांवर आणि कपोलकल्पित कहाण्यांवर विसंबून राहात हे पुस्तक लिहिल्याचा अनेकांचा आरोप आहे.
बंदी दु:खद
हा निर्णय दु:खद असून, प्रकाशकांनी उच्च न्यायालयात दाद मागावयास
हवी होती.
– रामचंद्र गुहा, -इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक