पुणे : द्वीपकल्पीय भारतातील झुरळांची पहिली आणि सर्वांत मोठी ‘डीएनए बारकोड’ संदर्भसूची शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. या सूचीद्वारे भारतातील सुमारे ६२ टक्के झुरळ प्रजाती प्रदेशनिष्ठ (एण्डेमिक) असल्याचेही निदर्शनास आले असून, ‘डीएनए’ बारकोडिंगमुळे देशातील झुरळांची विविधता पूर्वीच्या अंदाजांपेक्षा किती तरी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाचे पुण्यातील पश्चिम प्रादेशिक केंद्र, चेन्नईतील दक्षिण प्रादेशिक केंद्र आणि प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी याबाबत संयुक्त संशोधन केले. संशोधनाचा शोधनिबंध ‘झुटाक्सा’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. झुरळे केवळ स्वयंपाकघरात किंवा सार्वजनिक ठिकाणीच आढळतात असे नाही, तर झुरळांच्या अनेक प्रजाती दाट जंगलांमध्ये, गुहेमध्ये आणि सडलेल्या पानांच्या थरांमध्ये राहतात. तसेच, काही प्रजाती अजूनही विज्ञानासाठी अज्ञात असण्याची शक्यता आहे.
केवळ उपद्रवी कीटक म्हणून ओळख असलेल्या झुरळांचा प्रत्यक्षात पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन आणि वैविध्यपूर्ण कीटक गटांमध्ये समावेश होतो. नैसर्गिक परिसंस्थेचा समतोल राखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सेंद्रीय पदार्थांचे विघटन, जंगलातील अन्नसाखळी टिकवून ठेवण्याचे काम झुरळे करतात. झुरळांचे परिसंस्थात्मक महत्त्व असूनही त्यांच्या विविधतेचा पुरेसा अभ्यास झालेला नव्हता. आधुनिक डीएनए-आधारित तंत्रज्ञान आणि पारंपरिक वर्गीकरणशास्त्र यांची सांगड घालून संशोधकांनी अनेक अल्पपरिचित आणि पूर्वी नोंद न झालेल्या गटांचा शोध लावला. त्यासाठी डीएनए बारकोडिंग या पद्धतीचा वापर करण्यात आला.
‘डीएनए बारकोडिंग’ ही जीवांची ओळख पटविण्याची जनुकीय पद्धत आहे. यात लहान ‘डीएनए’ अनुक्रमांच्या आधारे शास्त्रज्ञ एखाद्या प्रजातीची अचूक ओळख पटवू शकतात. संशोधकांनी २०१९ ते २०२४ या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि तमिळनाडूतील जंगले, पानगळीचा भाग, खडकाळ प्रदेश आणि जैवविविधता क्षेत्रांतून १५० नमुने संकलित केले. त्यांमधून १२२ डीएनए बारकोड तयार करण्यात आले.
पारंपरिक आकारवैशिष्ट्यांच्या आधारे ५० गट ओळखण्यात आले होते; मात्र जनुकीय विश्लेषणात ८६ ते ९९ वेगवेगळ्या उत्क्रांतशील रेषा आढळल्या. यावरून अनेक ‘क्रिप्टिक स्पिशिज’ म्हणजे दिसायला सारख्या; पण जनुकीयदृष्ट्या भिन्न प्रजाती अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले. या अभ्यासात ४३ जनुकीय गट ज्ञात प्रजातींशी जुळले, तर ४४ गटांची निश्चित ओळख पटली नाही. त्यामुळे या नव्या प्रजाती असू शकतात. देशात आढळणार्या झुरळांच्या १९१ प्रजातींपैकी सुमारे ६२ टक्के झुरळ प्रजाती प्रदेशनिष्ठ (एण्डेमिक) असल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
‘झुरळे हा सर्वांत कमी अभ्यासल्या गेलेल्या कीटकगटांपैकी असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर माहिती दीर्घ काळानंतर नोंदवली जात आहे,’ असे प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या प्रा. रश्मी मोरे यांनी सांगितले.
‘डीएनए बारकोडिंग ही प्रभावी पद्धत’
‘अचूक पडताळणी आणि प्रमाणीकरण असलेल्या संदर्भसूची उपलब्ध असतील, तर प्रजाती ओळखण्यासाठी डीएनए बारकोडिंग वेगवान आणि विश्वासार्ह पद्धत आहे. तसेच ही पद्धत पारंपरिक वर्गीकरणशास्त्राला पूरक आहे,’ असे भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पुणे प्रादेशिक केंद्राचे डॉ. बसुदेव त्रिपाठी यांनी सांगितले. ‘नवीन तयार झालेली बारकोड संदर्भसूची वर्गीकरणशास्त्र, उत्क्रांती अभ्यास, जैवविविधता मूल्यांकन, पर्यावरणीय निरीक्षण, संवर्धन नियोजन, जैवसुरक्षा, कीटक ओळख आणि भविष्यातील जीनोमिक संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन ठरेल,’ असे प्रमुख संशोधक शबनम अन्सारी यांनी नमूद केले.
द्वीपकल्पीय भारतातील झुरळांवरील ‘डीएनए बारकोड’ अभ्यासामुळे स्थानिक वंशांच्या उत्क्रांतीविषयक विविधतेचे आकलन करण्यासाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. – डॉ. के. पी. दिनेश, प्रमुख, डीएनए बारकोडिंग अभ्यास गट
आजवर अज्ञात असलेल्या प्रजातींच्या विविधतेचा शोध घेणे, वर्गीकरणातील संदिग्धता दूर करणे आणि झुरळांसारख्या कमी अभ्यासलेल्या गटांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘डीएनए बारकोडिंग’ हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रभावी साधन ठरत आहे. – डॉ. ध्रुती बॅनर्जी, संचालक, भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग
