US Pentagon Military Shakeup Intent: अमेरिकेच्या संरक्षण विभागात (पेंटागॉन) सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, ट्रम्प प्रशासनाने लष्करी नेतृत्वात खांदेपालट करण्याचा धडाका लावला आहे. अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना पदावरून तडकाफडकी दूर केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून इराणने अमेरिकेची खिल्ली उडवत, ‘सत्तापालट यशस्वी झाला’ अशी खोचक टीका केली आहे.

लष्करी नेतृत्वात मोठी उलथापालथ

पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे ४१ वे चीफ ऑफ स्टाफ जनरल रँडी जॉर्ज यांचा कार्यकाळ एक वर्षाचा शिल्लक असतानाही ते ‘तात्काळ प्रभावाने’ निवृत्त होत आहेत. केवळ जॉर्जच नव्हे, तर जनरल डेव्हिड होडने आणि विल्यम ग्रीन ज्युनियर या अन्य दोन वरिष्ठ जनरल्सनाही पदावरून हटवण्यात आले आहे.

या हकालपट्टीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, मध्य पूर्वेतील (पश्चिम आशिया) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे.

इराणकडून ‘एक्स’वर खिल्ली

अमेरिकेतील या राजकीय आणि लष्करी उलथापालथीवर इराणने कडाडून टीका केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अमेरिकन लष्करी नेत्यांच्या बैठकीचे फोटो शेअर करत लिहिले, “सत्तापालट यशस्वीरित्या झाला.” या पोस्टसोबत ट्रम्प यांचा प्रसिद्ध नारा “MAGA” (Make America Great Again) आणि हसणारा इमोजी वापरून इराणने अमेरिकेच्या परिस्थितीचा उपहास केला आहे.

आक्रमणाला विरोध केल्याने कारवाई?

विश्लेषकांच्या मते, अमेरिकन लष्कराच्या एलिट ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे हजारो सैनिक सध्या मध्य पूर्वेच्या दिशेने रवाना होत आहेत. हे सैन्य इराणमधील संभाव्य जमिनीवरील कारवाईसाठी तैनात केले जात असल्याची शक्यता आहे. जनरल रँडी जॉर्ज यांनी कदाचित या जमिनीवरील आक्रमणाला विरोध दर्शवला असावा, ज्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात आले, असा तर्क लावला जात आहे.

पाम बाँडी यांचीही गच्छंती

लष्करी अधिकाऱ्यांसोबतच नागरी प्रशासनातही खळबळ उडाली आहे. ॲटर्नी जनरल पाम बाँडी यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त आहे. ‘एपस्टाईन फाईल्स’ हाताळण्यातील कथित गैरव्यवहार या कारवाईमागे असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या अमेरिकेच्या संरक्षण दलात सुरू असलेले हे फेरबदल जागतिक राजकारणावर आणि विशेषतः इराण-अमेरिका संघर्षावर काय परिणाम करतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.